belgaum

दूधसागरकडे बेकायदेशीर ट्रेक 32 जणांना दंड!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :वारंवार सूचना आणि निर्बंध असूनही पर्यटक दूधसागर धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी रेल्वे मार्गाचा वापर करत आहेत. याची गंभीर दखल घेणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने काल रविवारी रेल्वे मार्गावरून अनधिकृतपणे चालत जाणाऱ्या 32 जणांना पकडून त्यांच्यावर एकूण 16,000 रुपयांची दंडात्मक कारवाई केली.

सदरची कारवाई ही नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागांतर्गत रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) राबवलेल्या सप्ताहांत विशेष मोहीमेचा (विकेंड एनफोर्समेंट ड्राइव्ह’) एक भाग होती. कॅसलरॉक येथील आरपीएफ उपनिरीक्षकांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने आज सोमवारी दूधसागर (डीडीएस) आणि सोनालियम (एलआयएम) स्थानकांदरम्यानच्या रेल्वे मार्गावर अचानक तपासणी केली.

त्यावेळी दूधसागर धबधब्यापर्यंत जाण्यासाठी जंगलातील वाटेने प्रवेश केल्यानंतर पर्यटक रेल्वे मार्गावर अनधिकृतपणे वावरताना अधिकाऱ्यांना आढळले. नियम मोडणाऱ्या प्रत्येकाला 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. सुरक्षेच्या कारणास्तव दूधसागर धबधब्याकडे जाणारा रेल्वे मार्ग सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तरीही, दरवर्षी पावसाळ्यात पर्यटक या निर्बंधांकडे दुर्लक्ष करतात; यामुळे ते स्वतःचा जीव धोक्यात घालतातच, शिवाय या वर्दळीच्या घाट भागातील रेल्वे वाहतुकीसाठीही सुरक्षेचा प्रश्न निर्माण करतात.

 belgaum

या पार्श्वभूमीवर नैऋत्य रेल्वेने पुन्हा एकदा प्रतिबंधित रेल्वे मार्गावर प्रवेश करू नये असे आवाहन पर्यटकांना करण्याबरोबरच पावसाळाभर अशा प्रकारची कडक कारवाई सुरू राहील, असा इशाराही दिला आहे. अधिकाऱ्यांनी पर्यटकांना केवळ अधिकृत मार्गांचा वापर करण्याचे आणि रेल्वे मार्गालगत अनधिकृत ट्रेकिंग टाळण्याचे आवाहन केले आहे.

कर्नाटक-गोवा सीमेवर कॅसलरॉकजवळ स्थित असलेल्या दूधसागर धबधब्याकडे पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होते. प्रत्येक आठवड्याच्या शेवटी (विकेंडला) पर्यटकांची संख्या वाढत असल्याने, रेल्वे प्रशासनाने अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी देखरेख अधिक कडक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.