belgaum

खादरवाडीत उद्या-परवा रंगणार मरगाई देवीचा पारंपरिक गोंधळ

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : परंपरा, श्रद्धा आणि भक्तिभावाचे प्रतीक असलेला खादरवाडी येथील मरगाई देवीचा पारंपरिक गोंधळ यंदाही ७ आणि ८ जुलै रोजी मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्यासाठी परिसरातील तसेच विविध भागांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

मंगळवारी (७ जुलै) सकाळी मरगाई देवी मंदिरात अभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर देवीचे पुजारी पारंपरिक पद्धतीने मरगाई देवीच्या मूर्ती बनविण्याच्या विधीस प्रारंभ करतील. रात्री १० वाजता देवीच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली जाईल.

यानंतर रात्री ११ वाजता ‘पडल्या भरण्याचा’ धार्मिक विधी पार पडेल. त्यानंतर रात्री १२ वाजता ‘पडद्यातला’ हा पारंपरिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 belgaum

बुधवारी (८ जुलै) पहाटे ४ वाजता मरगाई देवी मंदिरासमोर पारंपरिक गोंधळ घालण्यात येईल. या धार्मिक विधीनंतर दिवसभर भाविकांसाठी ओटी भरणे, देवीचे दर्शन आणि महाप्रसाद असा कार्यक्रम होणार आहे.

दोन दिवसांच्या धार्मिक सोहळ्याची सांगता बुधवारी सायंकाळी ५ वाजता होईल. यावेळी मरगाई आईच्या मूर्तींची गावाच्या सीमेवरील जैतनमाळ येथे भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक विधींनी आदरपूर्वक विसर्जन मिरवणूक काढण्यात येईल.

मरगाई देवीच्या या पारंपरिक गोंधळाला शेकडो वर्षांची परंपरा लाभली असून, दरवर्षी मोठ्या श्रद्धेने हा उत्सव साजरा केला जातो. यंदाही भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.