बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात मान्सूनच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या संभाव्य आपत्तींना तोंड देण्यासाठी वन विभागाने जय्यत तयारी केली आहे. पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे रस्त्यांच्या कडेला असलेली झाडे किंवा त्यांच्या फांद्या कोसळून जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता असते.
ही धोकादायक झाडे हटवण्यासाठी बेळगाव प्रादेशिक वन विभागाने विशेष कृती आराखडा तयार केला असून, २४ तास कार्यरत राहणारा आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.
उप अरण्य संरक्षण अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार बेळगाव शहर शाखेत हे आपत्कालीन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी वन विभागाने कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार केले असून, त्यांच्यावर आठवड्यानुसार २४ तास देखरेखीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
हे कर्मचारी बेळगाव महानगरपालिकेच्या ‘सिटी ट्री डिझास्टर मॅनेजमेंट टीम’ या समूहावर थेट जीपीएस रीडिंग आणि छायाचित्रे अपलोड करणार आहेत.
या मोहिमेसाठी सोमवार ते रविवार अशी सातही दिवसांची कर्मचारी ड्युटी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये अशोक लाळसंगी, गिरीश बण्णद, एम. बी. जोतेन्नवर, प्रशांत तळवार, मंजुनाथ हुणश्याळी, शरणबसवेश्वर हत्तरकी, नूरअली नदाफ, सरफराज जकाती, डी. एस. भंडी आणि विठ्ठल बोरुतगी या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
झाडे कोसळल्यास त्वरित मदत उपलब्ध करून देण्यासाठी हे पथक आवश्यक सामग्रीसह तैनात राहील.
मान्सूनच्या कालावधीत सार्वजनिक सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे.




