बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील कॅम्प भागात रस्त्याशेजारी ताडपत्रीच्या आडोशाला राहणाऱ्या दोन असहाय्य वयोवृद्ध महिलांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर सुटला आहे. माजी आमदार दिवंगत संभाजी पाटील यांच्या पत्नीने आपल्या मालकीच्या घराच्या खोल्या या महिलांना विनाशुल्क राहण्यासाठी देऊन माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
कॅम्प परिसरातील महिला पोलीस ठाण्यासमोरील पदपथावर गेल्या दोन-तीन वर्षांपासून या महिला वास्तव्यास होत्या. मंगळवारी माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी या महिलांची भेट घेऊन त्यांच्या बिकट परिस्थितीची पाहणी केली होती आणि मदतीचे आश्वासन दिले होते.
आपले आश्वासन पूर्ण करत माजी आमदार बेनके यांनी माजी महापौर विजय मोरे यांच्या मदतीने या महिलांना शाश्वत निवारा मिळवून दिला. यासाठी दिवंगत संभाजी पाटील यांच्या पत्नीने तात्काळ सहकार्य करत कॅम्प येथील आपल्या मालकीच्या दोन खोल्या या वृद्ध महिलांसाठी उपलब्ध करून दिल्या. या दातृत्वामुळे परिसरात त्यांची मोठी प्रशंसा होत आहे.

माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी सांगितले की, सोशल मीडिया आणि वृत्तपत्रांतून माहिती मिळताच त्यांनी सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांच्यासह महिलांची भेट घेतली होती. त्यानंतर विजय मोरे यांच्याशी संपर्क साधून हा प्रश्न मार्गी लावला. तसेच गेली दोन-तीन वर्षे या महिलांच्या पोटापाण्याची व्यवस्था पाहणाऱ्या जयवंत बाडीवाले यांचेही त्यांनी आभार मानले.
यापूर्वी या महिलांना ‘शांताई वृद्धाश्रम’ आणि बैलहोंगल येथील वृद्धाश्रमाचा पर्याय देण्यात आला होता, मात्र त्यांनी तिथे राहण्यास नकार दिला होता. मुंबईला भावाकडे पाठवूनही त्यांनी पुन्हा बेळगावात आणून सोडले होते, अशी माहिती माजी महापौर विजय मोरे यांनी दिली. शेवटी संभाजी पाटील यांच्या पत्नीने केलेल्या मोठ्या मदतीमुळे हा प्रश्न सुटल्याचे सांगत त्यांनी अनिल बेनके, ललिता अडोनी, अक्का पथक आणि प्रसार माध्यमांचे आभार मानले.




