बेळगाव लाईव्ह : गेल्या काही दिवसांपासून लागलेली मंत्रिमंडळ विस्ताराची उत्सुकता अखेर संपली आहे. कर्नाटक राज्यातील नवीन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या, २२ जुलै २०२६ रोजी बेंगळुरू येथील राजभवनातील ग्लास हाऊसमध्ये पार पडणार आहे. या भव्य सोहळ्यासाठी राजभवनात जय्यत तयारी केली जात आहे.
या विस्तारात बेळगाव जिल्ह्याला भक्कम स्थान मिळण्याची अपेक्षा असून, जिल्ह्याचे राजकीय वजन पुन्हा एकदा सिद्ध होणार आहे. उत्तर कर्नाटकातील काँग्रेसचा गड मजबूत ठेवण्याच्या दृष्टीने ज्येष्ठ नेते आमदार लक्ष्मण सवदी यांच्या नावावर अंतिम मोहर उमटण्याची दाट शक्यता आहे. सवदी यांच्याव्यतिरिक्त बेळगाव जिल्ह्यातील इतर काही प्रमुख नेत्यांची नावे आघाडीवर असून, जिल्ह्याला लाल दिवा मिळणार का, याकडे संपूर्ण बेळगावचे लक्ष लागले आहे.
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आपल्या ८ ते १० समर्थक आमदारांच्या समावेशासाठी आग्रही आहेत, तर मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आपल्या निकटवर्तीयांना संधी देण्याच्या प्रयत्नात आहेत. जातीय (लिंगायत, वोक्कलिगा, दलित, अल्पसंख्याक) आणि प्रादेशिक समतोल साधत, आगामी २०२८ च्या विधानसभा निवडणुकीची पायाभरणी करण्यासाठी काँग्रेस हायकमांड (राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे) अंतिम यादीवर सही करणार आहे.
सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह एकूण १४ मंत्री कार्यरत आहेत. यात उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्याकडे महसूल आणि क्रीडा खात्याची धुरा आहे. उर्वरित प्रमुख मंत्र्यांमध्ये के. एच. मुनियप्पा (अन्न व नागरी पुरवठा), के. जे. जॉर्ज (ऊर्जा), एम. बी. पाटील (उद्योग व पायाभूत सुविधा), रामलिंगा रेड्डी (जलसंपदा), बेळगावचे सतीश जारकीहोळी (सार्वजनिक बांधकाम ), कृष्णा भैरेगौडा (बेंगळुरू विकास), प्रियांक खर्गे (गृह व माहिती तंत्रज्ञान), डॉ. यु. टी. खादर (आरोग्य), ईश्वर खंड्रे (ग्रामीण विकास व पंचायत राज), डॉ. यतींद्र सिद्धरामय्या (नगरविकास), भैरती सुरेश (वाहतूक) आणि शरणप्रकाश पाटील (वैद्यकीय शिक्षण) यांचा समावेश आहे. या १४ मंत्र्यांच्या खांदेपालटाशिवाय आता उर्वरित २० रिक्त जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देऊन मंत्रिमंडळाचा संपूर्ण विस्तार केला जाणार आहे.
उर्वरित २० रिक्त जागांसाठी ८० हून अधिक आमदारांनी फिल्डिंग लावली असून आगामी विधानसभा अधिवेशनापूर्वी संपूर्ण मंत्रिमंडळ पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, सिद्धरामय्या आणि केपीसीसी अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद हे वरिष्ठ नेते दिल्लीत ठाण मांडून असून काही तासांतच अंतिम चित्राची स्पष्टता होईल. जातीय आणि प्रादेशिक समतोल साधताना बेळगाव जिल्ह्याला यात कसा वाटा मिळतो, हे काही तासांतच स्पष्ट होणार आहे.





