बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील महंतेश नगर सेक्टर 10 येथील जनार्दन हावळ यांच्या घरासमोर लावलेल्या ब्रह्मकमळाच्या झाडाला मंगळवारी रात्री तब्बल ४० ब्रह्मकमळे एकाच वेळी उमलली. या दुर्मीळ नaQ
जाऱ्याने परिसरातील नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत गर्दी करून या अलौकिक फुलांचे दर्शन घेतले. अनेकांनी या अनोख्या क्षणाचे छायाचित्रण करून तो अविस्मरणीय अनुभव जपला.
ब्रह्मकमळ हे अत्यंत दुर्मीळ आणि वैशिष्ट्यपूर्ण फूल मानले जाते. हे फूल साधारणपणे वर्षातून एकदा किंवा अनुकूल वातावरणात काही वेळाच फुलते. विशेष म्हणजे हे फूल सूर्यास्तानंतर उमलण्यास सुरुवात करते आणि मध्यरात्री पूर्ण बहरात येते. पहाटेपर्यंत त्याची पाकळी मिटू लागते. त्यामुळे त्याचे सौंदर्य पाहण्यासाठी अनेकजण रात्री जागरण करतात.
ब्रह्मकमळाचे विशेष काय?
ब्रह्मकमळ हे रात्री फुलणारे दुर्मीळ फूल म्हणून प्रसिद्ध आहे.
भारतीय संस्कृतीत याला शुभ, पवित्र आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
अनेकांच्या श्रद्धेनुसार ब्रह्मकमळ उमलताना मनोभावे इच्छा व्यक्त केल्यास ती पूर्ण होते, अशी लोकमान्यता आहे.

या फुलाचा सुगंध अत्यंत मंद आणि मोहक असतो.
योग्य काळजी घेतल्यास एका झाडाला एकाच रात्री अनेक फुले उमलू शकतात.
जनार्दन हावळ यांच्या घरासमोर एकाच वेळी ४० ब्रह्मकमळे फुलल्याने हा परिसर सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला असून, हा दुर्मीळ नजारा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी उत्सुकता पाहायला मिळाली.





