belgaum

मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात पार पडले अंत्यसंस्कार

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : मृत व्यक्तीला अखेरचा निरोप देण्यासाठी आलेल्या कुटुंबीयांना दुःखाच्या क्षणीही गैरसोयींचा सामना करावा लागल्याची घटना सदाशिवनगर स्मशानभूमीत घडली. स्मशानभूमीतील प्रकाशव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याने रविवारी रात्री नागरिकांना मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करावे लागले. या प्रकारामुळे प्रशासनाच्या निष्काळजी कारभाराविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

रविवारी रात्री एका मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक आणि नागरिक मोठ्या संख्येने स्मशानभूमीत उपस्थित होते. प्रवेशद्वाराजवळ मर्यादित प्रकाश असला तरी अंत्यसंस्काराची जागा आणि परिसर पूर्णपणे अंधारात होता. पावसाळी वातावरणामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली. अखेर उपस्थितांनी मोबाईलच्या टॉर्चचा आधार घेत अंत्यविधी पार पाडला.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सदाशिवनगर स्मशानभूमीत केवळ प्रकाशव्यवस्थेचाच नव्हे तर पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधांचाही अभाव आहे. शहरातील महत्त्वाच्या स्मशानभूमींपैकी एक असलेल्या या ठिकाणी दररोज अनेक अंत्यसंस्कार होत असतानाही आवश्यक सुविधांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

 belgaum

“एखाद्या व्यक्तीच्या निधनाचे दुःख असतानाच अशा अडचणींचा सामना करावा लागणे वेदनादायक आहे. किमान प्रकाशाची व्यवस्था तरी प्रशासनाने करावी,” अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

स्मशानभूमीत तातडीने कायमस्वरूपी प्रकाशव्यवस्था, सुरक्षित वीजजोडणी, पिण्याच्या पाण्याची सुविधा, बसण्यासाठी शेड आणि इतर आवश्यक सोयी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.