belgaum

ग्रामस्थांचा अशोका बिल्डकॉनला पुन्हा इशारा

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : येळ्ळूर परिसरातील रस्त्यावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी अशोका बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी गाठत तीव्र शब्दांत जाब विचारला. रस्त्याचे संथ गतीने सुरू असलेले काम, पावसामुळे रस्त्यावर साचणारा चिखल आणि माती यामुळे सातत्याने अपघात होत असल्याने ग्रामस्थांनी कंपनीला पुन्हा एकदा कडक इशारा दिला.

पावसाळ्यात वाहनांच्या चाकांसोबत रस्त्यावर येणाऱ्या मातीमुळे रस्ता अत्यंत निसरडा झाला असून दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे वारंवार अपघात होत आहेत. अनेक वर्षांपासून रस्त्याचे काम सुरू असतानाही या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

मागील रविवारी निसरड्या रस्त्यामुळे झालेल्या अपघातात तब्बल २१ जण जखमी झाले होते. कामाच्या नियोजनातील त्रुटींमुळे स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

 belgaum

अपघातानंतर कंपनीतर्फे तात्पुरत्या स्वरूपात रस्त्याची स्वच्छता करून माती हटविण्यात आली. मात्र, अशा तात्पुरत्या उपायांऐवजी कायमस्वरूपी तोडगा काढून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी इशारा देताना सांगितले की, “येत्या काळात योग्य नियोजन करून रस्त्यावरील माती आणि अपघातांचा प्रश्न तातडीने सोडवला नाही, तर ग्रामस्थ रस्त्यावर उतरून काम पूर्णपणे बंद पाडतील.”

ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना सुनावताना सांगितले की, “काम लवकर पूर्ण व्हावे अशी आमचीही इच्छा आहे. मात्र, सध्याची परिस्थिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली नाही आणि भविष्यात ग्रामस्थांचा उद्रेक झाला किंवा काम बंद पडले, तर त्याला पूर्णपणे अशोका बिल्डकॉन प्रशासन जबाबदार असेल.”

यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश कुगजी, सुभाष कंग्राळकर, दौलत पाटील, प्रकाश पाटील, पराग कानशिडे, अभिजीत देसूरकर यांच्यासह परिसरातील स्थानिक नागरिक, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.