बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (GIT) आणि क्रेडाई बेळगाव यांच्यात विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राशी जोडणारा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी GIT येथे झालेल्या बैठकीत दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. क्रेडाई बेळगावने कर्नाटकात प्रथमच एखाद्या शैक्षणिक संस्थेसोबत असा सामंजस्य करार केला असून, हा उपक्रम राज्यातील पहिलाच असल्याचे सांगण्यात आले.
क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष युवराज हुलजी यांनी सांगितले की, या कराराचा उद्देश GIT मधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ नोकरीसाठी नव्हे, तर स्वतःचा व्यवसाय, बिल्डरशिप, कन्सल्टिंग इंजिनिअर, आर्किटेक्चर आणि बांधकाम क्षेत्रातील विविध करिअर संधींसाठी सक्षम बनविणे हा आहे.
या करारांतर्गत विद्यार्थ्यांसाठी दोन आणि चार महिन्यांचे विशेष इंटर्नशिप कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बांधकाम उद्योगातील अनुभव, आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि व्यावसायिक कौशल्ये मिळणार असून, उद्योग क्षेत्रातील गरजेनुसार त्यांना तयार केले जाणार आहे.

युवराज हुलजी यांनी सांगितले की, उद्योग आणि शिक्षण संस्थांमधील हा दुवा विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. भविष्यात सक्षम इंजिनिअर्स, बिल्डर्स आणि आर्किटेक्ट्स घडविण्यास या कराराची मोठी मदत होईल.
या प्रसंगी गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष राज बेळगावकर, संस्थेचे राम भंडारी, आर. एस. मुतालिक, अॅड. गणाचारी तसेच क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष युवराज हुलजी, प्रशांत वांडकर, आनंद कुलकर्णी आणि विरेश शेट्टनावर उपस्थित होते.
यावेळी क्रेडाई बेळगावच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वास व्यक्त केला की, कर्नाटकात प्रथमच शैक्षणिक संस्थेसोबत करण्यात आलेला हा उपक्रम बेळगावमधील विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी निर्माण करेल आणि उद्योग-शिक्षण क्षेत्रातील समन्वयाला नवी दिशा देईल.





