belgaum

शिवरायांचे विचार जगवा, समाज शिक्षणातून सक्षम करा’:संतोष लाड

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील इंगळी गावात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात केवळ पुतळ्याचे लोकार्पणच झाले नाही, तर शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेशही देण्यात आला. शिक्षण, सामाजिक ऐक्य आणि शिवरायांचे सर्वसमावेशक विचार यांवर उपस्थित मान्यवरांनी विशेष भर दिला.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माजी कामगार मंत्री व कलघटगीचे आमदार संतोष लाड यांनी समाजाने राजकारणापलीकडे जाऊन एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळात ५० टक्के आरक्षणाची अंमलबजावणी केली होती, मात्र आज मराठा समाजाला आरक्षणासाठी मागणी करावी लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. तरुणांनी केवळ सोशल मीडियात न अडकता उच्च शिक्षण घेऊन समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असेही ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांना कोणत्याही धर्माच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न होऊ नये, ते सर्वसमावेशक आणि सर्वधर्मसमभाव मानणारे राजे होते, असे सांगत त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगडावरील शिवरायांची समाधी शोधून काढल्याच्या ऐतिहासिक कार्याचाही उल्लेख केला.

 belgaum

विधानपरिषद सदस्य व दिल्लीतील कर्नाटक सरकारचे विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांनी मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेत इंगळी परिसरातील पूरग्रस्त जमिनीच्या पुनर्वसनासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिल्याची माहिती दिली. मतदारसंघातील विविध गावांत मराठा भवन उभारण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार गणेश हुक्केरी यांनी शिवरायांप्रती असलेली लोकांची श्रद्धा आणि महिलांच्या सुरक्षेसाठी तसेच विकासासाठी त्यांच्या घराण्याने कायम प्राधान्य दिल्याचे नमूद केले.

खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी शिवरायांचा स्वाभिमान, त्याग आणि राष्ट्रप्रेमाचा आदर्श आजच्या पिढीने आत्मसात करण्याची गरज व्यक्त केली. सीमाभागातील विविधतेतही ‘देश प्रथम’ हा विचार पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी केले.

माजी मंत्री श्रीमंत पाटील, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, काँग्रेस नेत्या सुप्रिया पाटील, बेंगळूर गोसावी मठाचे श्री मंजुनाथ महास्वामीजी आणि श्रीशैलचे जगद्गुरू डॉ. चनसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य स्वामीजी यांनीही शिवरायांचे राष्ट्रनिर्माण, सामाजिक समता, महिलांचा सन्मान आणि शिक्षण यावरील विचार अधोरेखित केले.

कार्यक्रमात पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांचा ‘पद्मश्री’ पुरस्काराबद्दल, तर प्रकाश हुक्केरी यांचा नवी दिल्लीतील विशेष प्रतिनिधीपदी नियुक्तीबद्दल सत्कार करण्यात आला. पुतळा उभारणीसाठी विशेष योगदान दिल्याबद्दल आमदार गणेश हुक्केरी यांचा नागरी सत्कार तसेच मूर्तिकार संदीप पाटील (कोल्हापूर) यांचाही गौरव करण्यात आला.

डोळ्यांचे पारणे फेडणारा अनावरण सोहळा

गावाच्या वेशीपासून झांज पथक, हलगी आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण होताच फटाक्यांची आतषबाजी, शिवगर्जना आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला. उपस्थित हजारो शिवभक्तांसाठी हा सोहळा अविस्मरणीय ठरला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.