बेळगाव लाईव्ह : कर्नाटकातील बेळगावसह मराठी भाषिक अल्पसंख्याक भागांमध्ये सुरू असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) प्रक्रियेसाठी मराठी भाषेतील फॉर्म उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडे केली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनात सावंत यांनी म्हटले आहे की, बेळगाव जिल्हा आणि सीमाभागात मोठ्या प्रमाणावर मराठी भाषिक नागरिक वास्तव्यास असून अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला आणि ग्रामीण भागातील मतदारांना कन्नड भाषेचे पुरेसे ज्ञान नाही. अशा परिस्थितीत एसआयआरचे फॉर्म केवळ कन्नड भाषेत उपलब्ध असल्याने हजारो मतदारांना फॉर्म समजून घेणे आणि अचूकपणे भरणे कठीण जात आहे.
निवेदनात १९९५ मधील कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाचाही उल्लेख करण्यात आला असून, मराठी भाषिक अल्पसंख्याकांच्या भाषिक अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर न्यायालयाने भर दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. निवडणुकीशी संबंधित कागदपत्रे मराठीत उपलब्ध करून देण्याची पूर्वीची परंपरा या निर्णयाच्या भावनेशी सुसंगत असल्याचेही सावंत यांनी म्हटले आहे.
मराठी फॉर्म उपलब्ध नसल्यामुळे अनेक मतदारांना इतरांवर अवलंबून राहावे लागत असून त्यामुळे फॉर्म भरताना चुका होण्याची, माहिती अपूर्ण राहण्याची किंवा मतदार यादीतून नाव वगळले जाण्याची शक्यता वाढत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

भारतीय राज्यघटनेतील कलम १४, १९, २१, २९ आणि ३५० चा उल्लेख करत भाषिक अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे संरक्षण करणे ही घटनात्मक जबाबदारी असल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
खासदार अरविंद सावंत यांनी निवडणूक आयोगाकडे चार प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये बेळगाव व इतर मराठी भाषिक भागांत एसआयआरचे फॉर्म मराठीत उपलब्ध करून देणे, मराठीत भरलेले फॉर्म स्वीकारण्यास परवानगी देणे, संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देणे आणि संपूर्ण एसआयआर प्रक्रियेदरम्यान मराठी भाषेत मतदार सहाय्य उपलब्ध करून देणे या मागण्यांचा समावेश आहे.
मराठीत एसआयआर फॉर्म उपलब्ध करून दिल्यास हजारो मराठी भाषिक मतदारांची अडचण दूर होईल, मतदारांचा सहभाग वाढेल आणि निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वासही सावंत यांनी व्यक्त केला आहे.





