belgaum

SIR मराठी अर्ज नसल्याने नागरिक त्रस्त;DC कडे मराठीचा आग्रह

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेसाठी अर्ज मराठी भाषेतही उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करत अनगोळ दक्षिण विभागातील रहिवाशांच्या शिष्टमंडळाने माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की, सध्या एसआयआर प्रक्रियेसाठी केवळ कन्नड भाषेतील अर्ज उपलब्ध आहेत. अनगोळ परिसरात मोठ्या प्रमाणावर मराठी भाषिक नागरिक वास्तव्यास असल्याने अर्ज समजून घेणे आणि तो अचूकपणे भरणे अनेकांसाठी कठीण जात आहे. कन्नड जाणणाऱ्या नागरिकांनाही अर्जातील काही बाबी समजून घेण्यात संभ्रम निर्माण होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, इंटरनेटच्या मदतीने अर्जाचे भाषांतर केल्यास मूळ मजकूर आणि भाषांतरातील अर्थामध्ये तफावत दिसून येते. मतदार यादीत नाव कायम ठेवण्यासाठी आणि नागरिकत्वाशी संबंधित महत्त्वाची माहिती सादर करण्यासाठी हा अर्ज अत्यंत महत्त्वाचा असल्याने कोणतीही चूक होऊ नये, यासाठी मराठी, कन्नड आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये अर्ज उपलब्ध करून द्यावेत तसेच तिन्ही भाषांतील अर्ज स्वीकारावेत, अशी मागणी करण्यात आली.

 belgaum

दरम्यान, एसआयआर प्रक्रियेसाठी मराठीतील अर्ज उपलब्ध करून देण्याच्या मागणीला वेग आला असून, यापूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांकडेही याच मागणीचे निवेदन दिले होते.

आता अनगोळ रहिवाशांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडेही मराठी भाषेचा आग्रह धरत स्वतंत्रपणे निवेदन सादर केल्याने या मागणीला अधिक बळ मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.