बेळगाव लाईव्ह : विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेसाठी मराठी भाषेतील अर्ज (Enumeration Forms) तातडीने उपलब्ध करून द्यावेत, तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि माजी नगरसेवकांनी शुक्रवारी बेळगाव महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांची भेट घेऊन केली.
यावेळी माजी नगरसेवक तथा ॲड. अमर येळळूरकर यांनी आयुक्तांना निवेदन सादर करत बेळगाव दक्षिणसह मराठी भाषिक मतदारांची लक्षणीय संख्या असलेल्या मतदारसंघांमध्ये निवडणूक आयोगाच्या १६ सप्टेंबर २००८ च्या आदेशानुसार मतदार याद्या व निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व साहित्य मराठीत उपलब्ध करून देणे बंधनकारक असल्याचे निदर्शनास आणून दिले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेत उपलब्ध करून देण्यात आलेले अर्ज केवळ कन्नड भाषेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मराठी भाषिक मतदारांना त्यांच्या भाषेत अर्ज उपलब्ध होत नसल्याने त्यांचे भाषिक व लोकशाही हक्क बाधित होत आहेत.
तसेच, २०२४ मध्येही याच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीने भारत निवडणूक आयोग तसेच भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांकडे पाठपुरावा केल्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी, कर्नाटक यांनी मराठी आणि कन्नड या दोन्ही भाषांमध्ये मतदार याद्या प्रसिद्ध करणे नियमांनुसार आवश्यक असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मराठीत मतदार याद्या व संबंधित साहित्य उपलब्ध करून दिल्याची आठवणही निवेदनात करून देण्यात आली आहे.

यावेळी एसआयआर प्रक्रियेसाठी मराठीतील अर्ज तात्काळ उपलब्ध करावेत, मराठी अर्ज उपलब्ध होईपर्यंत संबंधित मतदारसंघांतील एसआयआर प्रक्रिया स्थगित करावी आणि भविष्यात सर्व निवडणूक साहित्य, अर्ज, नोटिसा, मतदार याद्या व जनजागृती साहित्य मराठीत उपलब्ध करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
या चर्चेत माजी महापौर मालोजी अष्टेकर, शिवाजी सुंठकर, मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे माजी महापौर सरिता पाटील रेणू किल्लेकर संजय शिंदे, रणजित चव्हाण पाटील सुधा भातकांडे ,रेणू मुतगेकर सुनील बाळेकुंद्री माजी नगरसेवक नगरसेविका समिती कार्यकर्ते उपस्थित होते.




