बेळगाव लाईव्ह: शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय आणि न्यायालय परिसरामध्ये दररोज वाहनांच्या अनियंत्रित पार्किंगमुळे वाहतुकीचा मोठ्या प्रमाणावर खोळंबा होत आहे.
मुख्य रस्त्यावरच चारचाकी आणि दुचाकी वाहने बेजबाबदारपणे उभी केली जात असल्याने, या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
राणी चन्नम्मा चौकासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी ही परिस्थिती असूनही, रहदारी पोलीस विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई किंवा नियंत्रण दिसून येत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत नूतनीकरणाच्या टप्प्यात असल्याने तिथे कायमस्वरूपी गर्दी असते. आंदोलने, निवेदने देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या आणि न्यायालयीन कामांसाठी येणारे वकील, पक्षकार तसेच कागदपत्रांच्या कामासाठी झेरॉक्स व टायपिंग दुकानांत येणारी गर्दी यामुळे हा परिसर सतत गजबजलेला असतो.
शहराच्या चारही बाजूंनी येणारी वर्दळ याच मार्गावरून होत असल्याने येथील रस्ता अरुंद आहे. अशा परिस्थितीत, नियम धाब्यावर बसवून दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावरच पार्क केली जातात. मात्र, ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी किंवा अनधिकृत पार्किंगला शिस्त लावण्यासाठी रहदारी पोलीस विभागाकडून कोणतीही प्रभावी पावले उचलली जात नसल्याचे चित्र आहे.

परिसरात वाहनांच्या पार्किंगसाठी कोणतीही नियोजित व्यवस्था नसल्याने, नागरिक मिळेल तिथे वाहने उभी करतात. पोलीस प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने वाहतुकीची ही समस्या दररोजचे वास्तव बनली आहे. राणी चन्नम्मा चौकाजवळील हा मुख्य रस्ता असल्याने दिवसभरात अनेक वेळा वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. सरकारी कर्मचारी, विद्यार्थी आणि रुग्णवाहिकांनाही या कोंडीतून मार्ग काढताना कसरत करावी लागते.
नियमांची अंमलबजावणी करणे आणि रहदारी सुरळीत ठेवणे ही रहदारी पोलिसांची प्राथमिक जबाबदारी असतानाही, या भागात त्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष दिसून येत आहे. या समस्येकडे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी पोलीस विभाग मूक प्रेक्षक बनला आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
जोपर्यंत रहदारी पोलीस स्वतः पुढाकार घेऊन रस्त्यावरील पार्किंगवर नियंत्रण मिळवत नाहीत आणि दंडात्मक कारवाई करून शिस्त लावत नाहीत, तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वाहतुकीचा हा ‘खेळखंडोबा’ थांबण्याची शक्यता धूसर आहे.




