बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क संवर्गातील विविध ५ विभागांमधील एकूण २६१९ रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत. या भरतीमध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील रहिवाशांनाही अर्ज करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६’ ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागांतील उद्योग निरीक्षक, कर सहायक, तांत्रिक सहायक, लिपिक-टंकलेखक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षक अशी एकूण २६१९ पदे भरली जाणार आहेत. या सर्व पदांसाठीची संयुक्त पूर्व परीक्षा २७ सप्टेंबर २०२६ पासून महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर ऑनलाईन संगणक प्रणालीवर घेतली जाईल.
शासकीय निर्णयानुसार, महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या बेळगाव परिसरातील ८६५ मराठी भाषिक गावांमधील उमेदवारांनाही या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे. १० जुलै २००८ च्या शासन निर्णयातील तरतुदींनुसार, सीमाभागातील ८६५ गावांमधील पात्र रहिवाशांनी अर्ज करताना अधिवासाच्या पर्यायावर संमती दर्शवायची आहे. अंतिम निवडीनंतर कागदपत्र पडताळणीच्या वेळी संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला विहित नमुन्यातील वास्तव्याचा दाखला सादर करणे आवश्यक राहील.
या महाभरती अंतर्गत संवर्गनिहाय जागांचा तपशील पाहिला असता, लिपिक-टंकलेखक संवर्गासाठी सर्वाधिक १८६४ जागा भरल्या जाणार आहेत. याशिवाय सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी ४६१ जागा, कर सहायक पदासाठी २८२ जागा, उद्योग निरीक्षक पदासाठी ९ जागा आणि तांत्रिक सहायक पदासाठी ३ जागांचा समावेश आहे. प्रत्येक पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २७ जून २०२६ रोजी दुपारी २:०० वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज नोंदणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १७ जुलै २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत असेल. उमेदवारांनी शेवटच्या क्षणाची घाई टाळण्यासाठी विहित मुदतीत आपले अर्ज पूर्ण करावेत आणि ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे, असे आवाहन आयोगाचे सचिव यांनी केले आहे.




