बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील पिरणवाडी येथील सरकारी शाळा आणि महाविद्यालयांच्या मैदानासाठी जमीन आरक्षित करावी, या मागणीसाठी स्थानिक ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. मागणी पूर्ण न झाल्यास राष्ट्रीय महामार्गावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पिरणवाडी टाऊन पंचायत व्याप्तीमधील नागरिकांनी दिला आहे.
पिरणवाडी येथील सर्वे नंबर २१ मधील एकूण १२ एकर १० गुंठे जमिनीपैकी ८ एकर जमीन स्थानिक सरकारी कन्नड मॉडल शाळा, मराठी उच्च प्राथमिक शाळा आणि उर्दू उच्च प्राथमिक व हायस्कूलसह पदवीपूर्व व पदवी महाविद्यालयाच्या क्रीडांगणासाठी मंजूर करावी, अशी मुख्य मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या परिसरात सध्या १,१०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून, शाळांच्या अवतीभवती असलेल्या निवासी भागामुळे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे शैक्षणिक प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत.

सदर शाळा जांबोटी-गोवा राष्ट्रीय महामार्गाला लागून असल्याने विद्यार्थ्यांना दररोज अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. शाळांना हक्काचे मैदान आणि सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंत नसल्यामुळे शाळा सुटण्याच्या वेळेत तसेच इतर वेळी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परिसरात अनधिकृत वाहनांचे पार्किंग केले जात असल्याने विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या गंभीर समस्येबाबत २०१६ आणि २०२५ मध्येही स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाला निवेदने देण्यात आली होती.
या समस्येवर तात्काळ तोडगा काढून सदर जमीन बेळगाव शिक्षण विभागाच्या नावावर हस्तांतरित करावी, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांच्या वतीने बेळगावचे जिल्हाधिकारी आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
जर प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष करून सदर जमीन इतर कोणत्याही संस्थेला किंवा विभागाला देण्याचा प्रयत्न केला, तर पिरणवाडी राष्ट्रीय महामार्ग २५१ खानापूर बायपास मुख्य रस्त्यावर पूर्णपणे वाहतूक रोखून तीव्र आंदोलन केले जाईल, अशी प्रतिक्रिया पिरणवाडी ग्रामस्थांनी दिली आहे.




