बेळगाव लाईव्ह: मराठा मंडळ संस्थेच्या जिजामाता हायस्कूलचे मुख्याध्यापक एन. डी. पाटील ३२ वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने हायस्कूलच्या वतीने एका निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
दीर्घकाळ शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या आणि हजारो विद्यार्थी घडवणाऱ्या मुख्याध्यापक एन डी पाटील यांचा हायस्कूलच्या वतीने, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि आजी-माजी विद्यार्थ्यांकडून शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित अनेक मान्यवर, सहकारी आणि आजी-माजी विद्यार्थ्यांनी पाटील यांच्याबद्दल आपले विचार मांडले. एन डी पाटील यांचा शिस्तप्रिय स्वभाव, विषयावरील पकड, एनसीसी अधिकारी म्हणून त्यांनी केलेले उल्लेखनीय कार्य आणि क्रीडा क्षेत्रात हायस्कूलला मिळवून दिलेले यश, या आठवणींना मान्यवरांनी उजाळा दिला. त्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांचे जीवन कसे बदलले, हे सांगताना उपस्थितांनी त्यांच्या शैक्षणिक योगदानाचे कौतुक केले.
सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापक एन. डी. पाटील यांनी आपल्या ३२ वर्षांच्या शैक्षणिक प्रवासाचा आढावा घेतला. ते म्हणाले, “खानापूर येथून सुरू झालेला हा प्रवास सर्व सहकाऱ्यांच्या मदतीमुळे यशस्वी ठरला.

एनसीसी आणि क्रीडा क्षेत्रात हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर यश मिळवले. तसेच यंदा हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला आणि विद्यार्थिनी शहरात पहिली आली, हा मोठा आनंद आहे. हे यश सर्वांच्या कष्टाचे फळ असून सेवानिवृत्तीनंतरही समाजकार्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन.”
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी एन डी पाटील यांना त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला मराठा मंडळ संस्थेचे संचालक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, मुख्याध्यापक एन डी पाटील यांचे मित्र, नातेवाईक, हायस्कूलमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




