belgaum

ग्रामीणसाठी पुनश्च एसआयआर मॅपिंग करा

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव ग्रामीण मतदारसंघात ‘विशेष सखोल पुनरावलोकन’ (एसआयआर) प्रक्रियेच्या अंमलबजावणीतील अनियमिततेबाबत भाजप बेळगाव ग्रामीणचे माजी अध्यक्ष धनंजय आर. जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून निवडणूक आयोगाने बेळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी केंद्रीय निरीक्षकाच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एसआयआर मॅपिंग केले जावे, अशी मागणी केली आहे.

भाजप बेळगाव ग्रामीणचे माजी अध्यक्ष धनंजय आर. जाधव यांनी आज बुधवारी सकाळी आपल्या समर्थकांसमवेत उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकाने निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. ‘विशेष सखोल पुनरावलोकन’ (एसआयआर) या प्रक्रियेचा उद्देश प्रत्येक पात्र मतदाराचा समावेश मतदार यादीत करणे आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व काटेकोरपणे राबवणे हा आहे.

तथापि, एसआयआर प्रक्रिया राबवताना आढळलेल्या खालील बाबींची आपण चौकशी करावी, अशी मी विनंती करतो. विवाहित महिलांचे मॅपिंग (नोंदणी प्रक्रिया) करताना, त्या बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात आल्या असतानाही त्यांना ‘मुलगी’ म्हणून दर्शवण्यात आले आहे; त्यांच्या पालकांच्या तपशीलांचा विचार किंवा पडताळणी करण्यात आलेली नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांनी एसआयआर प्रक्रियेच्या नियमांचे पालन केले नाही.

 belgaum

मॅपिंगमध्ये अनियमितता झाली असल्याने, निवडणूक आयोगाने बेळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी नियुक्त केलेल्या निरीक्षकाच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा मॅपिंग केले जावे, तरच आपल्या मतदारसंघात एसआयआर प्रक्रिया योग्यरित्या पार पडेल. सर्व पात्र नागरिकांच्या मतदानाच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी बेळगाव ग्रामीण तालुक्यात एसआयआर प्रक्रियेच्या अंमलबजावणीची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी केली जावी; निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन झाले आहे की नाही याची पडताळणी केली जावी; जिथे कुठे प्रक्रियात्मक त्रुटी आढळतील तिथे योग्य सुधारणात्मक उपाययोजना केल्या जाव्यात; आणि प्रशासकीय त्रुटींमुळे कोणताही पात्र मतदार मतदार यादीतून वगळला जाणार नाही, याची खात्री करण्यासाठी योग्य सूचना दिल्या जाव्यात, ही विनंती अशा आशयाचा तपशील धनंजय जाधव यांनी यांच्या निवेदनात नमूद आहे.

निवेदन सादर केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांची बोलताना धनंजय जाधव यांनी सांगितले की, कर्नाटकात एसआयआरचे काम सुरू झाले आहे. या पद्धतीने 20 वर्षातून एकदा एसआयआर अर्थात विशेष विशेष सखोल पुनरावलोकन केले जात असते. मात्र यासाठी बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघासह विशेष करून बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात ते मॅपिंग व्यवस्थित झालेले नाही.

जे मतदार दिवंगत झाले आहेत त्यांचे नाव मतदार यादीतून वगळणे, जे येथून अन्यत्र स्थलांतरित झाले आहेत अशांचे नाव वगळणे आणि जे येथे स्थलांतरित झाले आहेत त्यांचे नांव मतदार यादीत समाविष्ट करणे त्याचप्रमाणे ज्यांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत त्यांची नावे यादीत समाविष्ट करणे, हा एसआयआरचा उद्देश आहे. यासंदर्भात बेळगाव ग्रामीण मतदार संघात जाणीवपूर्वक एक गफलत मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. उदाहरणादाखल लग्न करून दुसऱ्या गावी सासरी आलेल्या एखाद्या विवाहितेचे नांव 2002 च्या मतदार यादीत आहे. तेंव्हा एसआयआर मॅपिंगमध्ये तिच्या मूळ गावातील तिची, तिच्या आई-वडील वगैरे यांची माहिती घेतली गेली पाहिजे.

मात्र तसे न करता सर्व बीएलओंनी प्रत्यक्ष फिरून माहिती संकलित करण्याऐवजी घरात बसून कॉपी-पेस्टचे काम केले आहे. त्यांनी सासू-सासर्‍याला आई बाप दाखवले असून त्यामुळे संबंधित महिलांचे पतीशी असलेले पत्नीचे नाते बदलून ते बहिणीचे नाते झाले आहे. याव्यतिरिक्त मतदार यादी मधून ज्यांची नावे वगळली जावयास हवी ती वगळण्यात आलेली नाही. एकंदर मॅपिंग व्यवस्थित नसल्यामुळे बेळगाव ग्रामीणमध्ये पुनश्च नव्याने ते केले जावे अशी आमची मागणी आहे. या संदर्भात आम्ही केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाला आम्ही ईमेल केला आहे.

त्यामध्ये एसआयआर करिता बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी केंद्राचा एक अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी आम्ही केली आहे. याव्यतिरिक्त बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील एका धार्मिक संस्थेमध्ये बसून काही लोक बीएलओ ना फोन करून ओटीपी घेऊन ॲप ओपन करत आहेत. या बेकायदेशीर कृत्याच्या माध्यमातून मतदार यादीतून वगळण्यात आलेली नावे पुन्हा यादीत समाविष्ट केली जात आहेत. तेंव्हा या सर्व गोष्टींची सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे आणि केंद्रीय अधिकाऱ्याच्या उपस्थितीत एसआयआरची पुढील प्रक्रिया झाली पाहिजे. बेळगाव ग्रामीणमध्ये नव्याने मॅपिंग झाले पाहिजे अशा आपल्या मागण्या असल्याचे धनंजय जाधव यांनी शेवटी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.