बेळगाव लाईव्ह :भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) कर्नाटक राज्यभरात मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरावलोकन’ (एसआयआर) -2026 अंतर्गत ‘घरोघरी जाऊन माहिती संकलन’ करण्याची मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम आज मंगळवार दि. 30 जून ते बुधवार दि. 29 जुलै 2026 या कालावधीत राबविली जात असून यात कर्नाटक राज्यातील 5.54 कोटींहून अधिक मतदारांचा समावेश असेल. या विशेष सखोल पुनरावलोकनाचा उद्देश प्रत्येक पात्र मतदाराचा समावेश मतदार यादीत करणे आणि याद्या अचूक, पूर्ण व अद्ययावत ठेवणे हा आहे.
‘विशेष सखोल पुनरावलोकन’ (एसआयआर) म्हणजे काय? : एसआयआर ही मतदारांच्या पडताळणीची एक विशेष मोहीम आहे. या मोहिमेअंतर्गत 16 जून 2026 रोजी मतदार यादीत ज्यांची नावे आहेत, अशा मतदारांना ‘माहिती संकलन फॉर्म’ देण्यासाठी बूथ लेव्हल अधिकारी त्यांच्या नियुक्त मतदान क्षेत्रातील प्रत्येक घरांना भेट देतील. सामान्य मतदार नोंदणी किंवा दुरुस्ती मोहिमांच्या विपरीत, या घरोघरी जाऊन माहिती संकलन करण्याच्या टप्प्यात कोणतीही कागदपत्रे गोळा केली जाणार नाहीत.
टप्प्याटप्प्याने प्रत्येक मतदाराने काय करावे? : टप्पा 1 – माहिती संकलन फॉर्म (एन्युमरेशन फॉर्म) प्राप्त करणे. जर तुमचे नांव 16 जून 2026 रोजी मतदार यादीत असेल, तर बूथ लेव्हल अधिकारी तुमच्या घरी येऊन तुम्हाला ‘माहिती संकलन फॉर्म’ देतील. टप्पा 2 – तपशील भरणे. तुमची वैयक्तिक माहिती तपासा, माहिती संकलन फॉर्म काळजीपूर्वक भरा आणि त्यावर स्वाक्षरी करा.
टप्पा 3 – फॉर्म सादर करणे. भरलेला फॉर्म पुन्हा तुमच्या घरी येणाऱ्या बीएलओकडे सुपूर्द करा. कोणताही मतदार राहून जाऊ नये म्हणून, भरलेले फॉर्म गोळा करण्यासाठी बीएलओ आवश्यकतेनुसार तीन वेळा भेट देतील. टप्पा 4 – इच्छा असल्यास अर्ज ऑनलाइन सादर करणे. आज मंगळवारी 30 जूनपासून मतदार खालील माध्यमांतूनही माहिती संकलन फॉर्म ऑनलाइन भरू आणि सादर करू शकतात: -https://voters.eci.gov.in/, -ECINET मोबाइल ॲप्लिकेशन.
घरांवर लावलेल्या स्टिकर्सचा अर्थ काय आहे? : सर्वेक्षणादरम्यान, बीएलओ घरांवर रंगीत स्टिकर्स लावतील. त्यापैकी जांभळ्या रंगाच्या चौकोनी स्टिकरचा अर्थ माहिती संकलन (एन्युमरेशन) फॉर्म पोहोचवला गेला आहे. तसेच लाल रंगाच्या गोलाकार स्टिकरचा अर्थ बूथ लेव्हल ऑफिसर यांच्या भेटीदरम्यान घर कुलूपबंद किंवा बंद आढळले.
महत्त्वाचे म्हणजे मुदत चुकवू नका : निवडणूक आयोगाने हे स्पष्ट केले आहे की, केवळ जे मतदार विहित कालावधीत योग्यरित्या भरलेला माहिती संकलन फॉर्म सादर करतील, त्यांचाच समावेश मसुदा मतदार यादीत केला जाईल. जर माहिती संकलन फॉर्म प्राप्त झाला नाही, तर त्या मतदाराचे नांव मसुदा मतदार यादीत समाविष्ट केले जाणार नाही. संकलन केल्यानंतर सर्व भरलेले फॉर्म निवडणूक आयोगाद्वारे डिजिटाइज अर्थात संगणकीकृत केले जातील.
जर तुम्ही नुकतेच मतदानासाठी पात्र झाला असाल तर? : जे नागरिक नुकतेच 18 वर्षांचे झाले आहेत किंवा अन्य प्रकारे मतदानासाठी पात्र ठरले आहेत, ते भारतीय निवडणूक आयोगाच्या (ईसीआय) सूचनांनुसार विहित घोषणापत्रासह ‘फॉर्म 6’ सादर करून मतदार यादीत नांव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करू शकतात.
महत्त्वाच्या तारखा : 30 जून 2026 – घरोघरी जाऊन माहिती संकलन आणि माहिती संकलन फॉर्म ऑनलाइन सादर करण्यास सुरुवात. 29 जुलै 2026 – घरोघरी जाऊन माहिती संकलन आणि फॉर्म संकलनाची प्रक्रिया पूर्ण. 7 ऑक्टोबर 2026 – अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाईल. भारतीय निवडणूक आयोग या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हीजन) प्रक्रियेचे वर्णन ‘सहभागी, पारदर्शक आणि नागरिक-केंद्रित उपक्रम’ असे करते. मतदारांना सल्ला दिला जातो की त्यांनी बूथ लेव्हल ऑफिसर्सना (बीएलओ) सहकार्य करावे आणि विहित कालावधीत आपले माहिती संकलन फॉर्म सादर करावेत, जेणेकरून त्यांची नावे मसुदा मतदार यादीत आणि त्यानंतर अंतिम मतदार यादीत समाविष्ट होतील याची खात्री करता येईल.




