belgaum

उच्चाधिकार समितीच्या बैठकीसाठी सामंतांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; हालचालींना वेग

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेल्या मागणीनुसार प्रलंबित असलेल्या उच्च अधिकार समितीच्या बैठकीबाबत हालचालींना वेग आला आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून उच्च अधिकार समितीची बैठक तातडीने बोलविण्याची विनंती केली आहे.


बेळगाव दौऱ्यादरम्यान उदय सामंत यांनी सीमाभागातील नेत्यांशी चर्चा करताना, मुंबईतील मुख्यमंत्री निवासस्थानासमोर जाहीर करण्यात आलेले आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती केली होती. त्यावेळी त्यांनी उच्च अधिकार समितीची बैठक तातडीने घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र देणार असल्याचे आश्वासन दिले होते.


यानंतर सामंत यांनी आपल्या आश्वासनाची पूर्तता करत मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात सीमाप्रश्नासंदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी उच्च अधिकार समितीची बैठक तातडीने आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 belgaum

दरम्यान, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनीही उदय सामंत यांना समितीची बैठक घेण्याबाबत निवेदन दिले होते. त्याआधी बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत सामंत यांनी, “मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीला आंदोलन करण्याची गरज भासणार नाही. आचारसंहिता संपल्यानंतर २५ जूननंतर उच्च अधिकार समितीची बैठक घेण्यासाठी प्रयत्न केले जातील,” असे आश्वासन दिले होते.

सामंत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवल्यानंतर आता उच्च अधिकार समितीच्या बैठकीबाबत मुंबईत प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांच्या अपेक्षा पुन्हा एकदा उंचावल्या आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.