बेळगाव लाईव्ह :महान राष्ट्रपुरुष व जगातील पहिल्या लोकशाहीवादी स्वतंत्र राष्ट्राचे संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या होदेगिरी (जि. दावणगिरी, कर्नाटक) येथील ऐतिहासिक समाधी स्थळाची दुरावस्था झाली आहे. तेंव्हा भारत सरकारने स्वतः या समाधी स्थळाचा विकास करावा किंवा सदरची समाधी व परिसर विकासासाठी कर्नाटक सरकारकडे हस्तांतरित करावा अन्यथा देशभर जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा मावळा जवान संस्था व अखिल भारतीय छत्रपती शिवाजी महाराज क्षेत्रीय मराठा संघ पुण्याचे अध्यक्ष, तसेच ज्येष्ठ इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे यांनी दिला आहे.
बेळगाव शहरातील राणी चन्नम्मा सर्कल येथील कन्नड साहित्य भवन येथे आज बुधवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. दत्ताजी नलावडे यांनी सांगितले की, महान राष्ट्रपुरुष शहाजीराजे भोसले यांच्या दावणगिरी जिल्ह्यातील होदेगिरी येथील समाधी स्थळाची अत्यंत दुरावस्था झाली आहे.
भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे समाधीचा ढाचा ढासळत चालला असून समाधी जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. होदेगिरी येथे मोहिमेवर असताना शहाजीराजे भोसले यांचा मृत्यू झाला. तेंव्हा त्या ठिकाणी त्यांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज व व्यंकोजीराजे भोसले यांनी शहाजीराजे यांची समाधी उभारून समाधीच्या देखभाल पूजेसाठी जमीन बक्षीस दिली.
पुढे स्थानिक क्षेत्रीय मराठा समाजाच्या त्याग परिश्रमामुळे शहाजीराजे भोसले यांचे समाधी स्थळ देशाला माहीत झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने या समाधीला संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. मात्र शहाजीराजे भोसले यांच्या समाधीकडे आजतागायात सरकारचे दुर्लक्ष झालेले आहे.
समाधीवर छत्र बसवण्यात आलेले नसून समाधी स्थळाचा विकास झालेला नाही. राज्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळे उन्हा-पावसाचा तडाखा शहाजीराजे यांच्या पवित्र समाधीला बसत आहे. परिणामी समाधीचा दीपस्तंभ व दगडी चिऱ्यांसह समाधी कमकुवत झाली आहे. त्यामुळे आगामी काळात समाधीची मोठ्या प्रमाणात झीज होऊन ती नामशेष होण्याची शक्यता आहे.
समाधीची जागा भारत सरकारच्या पुरातत्त्व खात्याकडे असल्यामुळे समाधी स्थळ व परिसरात कोणत्याही प्रकारची डागडुजी करता येत नाही किंवा मेमोरियल उभारता येत नाही. कर्नाटक सरकारने अनेक वेळा या समाधीच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला असला तरी केंद्र सरकारच्या पुरातत्त्व खात्याकडून मंजुरी मिळत नसल्याने तो निधी खर्च न होता परत सरकारी तिजोरीत जमा होत आहे. त्यामुळे समाधीचा विकास कागदावरच आहे.

शहाजीराजे भोसले यांच्या त्यागी जीवन, महापराक्रम व मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांनी परकीयांच्या गुलामगिरीतून भारतीय भूमिपुत्रांची मुक्तता करून जगातील पहिले स्वतंत्र राष्ट्र निर्माण केले, अशी माहिती देऊन या पद्धतीने स्वातंत्र्याचे स्फूर्ती स्थान असलेल्या महान राष्ट्रपुरुष शहाजीराजे भोसले यांच्या ऐतिहासिक समाधी स्थळाचा भारत सरकारने स्वतः विकास करावा किंवा समाधी स्थळाच्या विकासासाठी सदरची वास्तू व परिसर कर्नाटक सरकारकडे हस्तांतरित करावा, अन्यथा देशभर जनआंदोलन छेडले जाईल, असे पुण्याचे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे यांनी शेवटी स्पष्ट केले.
आजच्या पत्रकार परिषदेस मावळा जवान संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते शंकरराव निवंगुणे, रायरेश्वर शिवपिठाचे शिवाचार्य स्वामी सुनील जंगम, संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष रोहित नलावडे, सचिव हनुमंत दिघे, संघटनेचे दक्षिण प्रांताध्यक्ष अण्णोजीराव नलावडे आदी उपस्थित होते.




