बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील महाद्वार रोड, अष्टेकर गल्ली येथे एका नवविवाहितेने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
रक्षिता पुजारी (वय 29) असे आत्महत्या करणाऱ्या नवविवाहितेचे नांव आहे. गेल्या महिन्याभरापूर्वी रक्षिता हिचा विवाह मंजुनाथ कृष्णा पुजारी याच्याशी झाला होता. रक्षिता ही एका खाजगी कंपनीमध्ये वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम करत होती.
रक्षिताचे माहेर शिवाजीनगर, बेळगाव असून तिचा पती उद्यमबाग येथे कामाला जातो. काल मंगळवारी पती कामावर गेल्यानंतर रक्षिताने आपल्या आईला फोन केला होता. त्यानंतर तिने दरवाजा बंद करून फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली.

पती मंजुनाथ दुपारी घराकडे परतल्यानंतर त्याने खिडकीतून आत डोकावून पाहिले असता त्याला रक्षिताने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. याबाबतची माहिती मिळताच मार्केट पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक रुक्मिणी ए. व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली.
तसेच सायंकाळी पंचनामा झाल्यानंतर रक्षिताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात धाडण्यात आला. रक्षिता हिच्या आत्महत्येचे निश्चित कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.




