belgaum

चव्हाट गल्लीत गटारीमिश्रित दूषित पाणी पुरवठा

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :शहरातील चव्हाट गल्ली भागात गेल्या सहा महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यात थेट गटारीचे आणि ड्रेनेजचे दूषित पाणी मिसळत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य पूर्णपणे धोक्यात आले आहे. या गंभीर समस्येबाबत स्थानिक रहिवाशांनी संबंधित पाणी पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊन आणि दूषित पाण्याचे थेट पुरावे पाठवूनही यावर कोणताही ठोस उपाय शोधला गेलेला नाही.

प्रशासनाचा ढिसाळपणा आणि जबाबदार व्यक्तींकडून मिळणारी उडवाउडवीची उत्तरे यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र असंतोष पसरला आहे. ड्रेनेजची मुख्य वाहिनी फुटल्यामुळे हे मैलायुक्त पाणी थेट पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसळत असून, यामुळे लहान मुलांसह वृद्ध नागरिक मोठ्या प्रमाणावर आजारी पडत आहेत.

या समस्येवर चार महिन्यांपूर्वीही स्थानिक पातळीवर आंदोलन करण्यात आले होते, परंतु त्यावेळी केवळ पोकळ आश्वासने देण्यात आली. आता जर हा पाण्याचा प्रश्न तातडीने सुटला नाही, तर गल्लीतील महिला रस्त्यावर उतरून भर चौकात तीव्र ठिय्या आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे.

 belgaum

या संपूर्ण प्रकरणावरून बेळगाव शहराच्या पाणी पुरवठा व्यवस्थेवर आणि नियोजनशून्य कारभारावर नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पूर्वी महानगरपालिकेकडून होणारा पाणी पुरवठा यापेक्षा कितीतरी पटीने सुटसुटीत आणि स्वच्छ होता, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. चव्हाट गल्लीतील भुयारी गटार योजनेचे (युजीडी) काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडण्यामागे केवळ अंतर्गत कमिशनबाजी आणि भ्रष्टाचार कारणीभूत असल्याचा थेट आरोप नागरिकांनी केला आहे. या कामासाठी चार महिन्यांपूर्वीच निधी मंजूर झाला असतानाही काम जाणीवपूर्वक थांबवून ठेवण्यात आले आहे.

दुसरीकडे, या समस्येबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यात व्यस्त आहेत. कंत्राटदार लोकप्रतिनिधींचे नाव सांगून काम टाळत आहे, तर लोकप्रतिनिधी आपल्या हातात काही नसल्याचे सांगत आहेत. अधिकारी वर्ग मात्र आपण आपले काम चोख बजावल्याचा दावा करत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. येत्या शुक्रवारपर्यंत यावर कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास सर्व नागरिक थेट जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहेत.

नागरिकांचा वाढता रोष पाहता अखेर प्रशासकीय पातळीवर काही हालचाली सुरू झाल्या असून, पाण्याचा हा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी येत्या शुक्रवारी सकाळी ११:०० वाजता जिल्हाधिकार्‍यांसोबत एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला पाणी पुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, इतर संबंधित खात्यांचे प्रतिनिधी आणि चव्हाट गल्लीतील नागरिकांचे शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहे

. केवळ चर्चा न करता दुसऱ्याच दिवसापासून प्रत्यक्ष जमिनीवर काम सुरू करून गल्लीत नवीन पाईपलाईन टाकली जावी आणि प्रत्येक घराला स्वच्छ पाण्याचे थेट कनेक्शन दिले जावे, अशी ठाम मागणी नागरिकांनी केली आहे. महिनाभरातून अवघ्या दोन ते तीन वेळा पाणी सोडले जाते आणि तेही पूर्णपणे दूषित असते, अशा परिस्थितीत नागरिकांना वर्षभरापासून पाण्याचे बिलही मिळालेले नाही. त्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा तात्काळ थांबवून स्वच्छ पाणी न मिळाल्यास आणि भ्रष्टाचाराची चौकशी न झाल्यास हे आंदोलन संपूर्ण शहरात पसरण्याची चिन्हे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.