बेळगाव लाईव्ह :
पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी मित्रांसोबत गोव्यातील सुरल धबधब्याकडे निघालेला बेळगावचा २० वर्षीय आदित्य दीपककुमार सत्पती याच्यासाठी ही सहल आयुष्यातील अखेरची ठरली. एका क्षणाच्या दुर्लक्षामुळे पाण्याच्या खोल प्रवाहात तो बुडाला आणि आनंदाच्या सहलीचे रूपांतर क्षणात शोकांतिकेत झाले.
रविवारी गोव्याच्या सत्तरी तालुक्यातील म्हादई अभयारण्य परिसरातील सुरल धबधब्यावर आदित्य मित्रांसोबत गेला होता. धबधब्याचे सौंदर्य पाहताना त्याने पाण्यात प्रवेश केला. मात्र पाण्याची खोली आणि वेगवान प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेला. मित्रांनी जीवाची बाजी लावून त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता.
घटनेची माहिती मिळताच वाळपई पोलीस, अग्निशमन दल आणि म्हादई अभयारण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

मात्र मुसळधार पाऊस, वेगवान प्रवाह आणि दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे शोधमोहीम वारंवार अडथळ्यात आली. रविवारी रात्री शोधकार्य थांबवावे लागले असून सोमवारी सकाळी पुन्हा मोहीम सुरू करण्यात आली.
आदित्यचे कुटुंब मूळचे ओडिशातील असले तरी अनेक वर्षांपासून बेळगावमध्ये वास्तव्यास आहे. त्याचे वडील दीपककुमार सत्पती हे भारतीय नौदलातून निवृत्त अधिकारी आहेत. मुलाच्या दुर्घटनेची बातमी मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. आनंदाने सहलीला गेलेल्या मुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबावर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, पावसाळ्यात सुरलसह म्हादई अभयारण्यातील धबधब्यांकडे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. वन विभागाकडून वारंवार इशारे देऊनही अनेकजण धोकादायक ठिकाणी उतरतात. आदित्यची ही घटना पुन्हा एकदा पावसाळी पर्यटनातील निष्काळजीपणाची मोठी किंमत किती भयावह असू शकते, याची जाणीव करून देणारी ठरली आहे.




