belgaum

गरीब विद्यार्थ्यांसाठी पोतदार ट्रस्टचा मदतीचा हात;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असलेल्या बेळगाव शहरातील विविध शाळांमधील 107 गरीब गरजू विद्यार्थी -विद्यार्थिनींच्या शाळेचे संपूर्ण वर्षभराचे शैक्षणिक शुल्क अर्थात फी पोतदार एज्युकेशन ट्रस्टतर्फे भरण्यात येत असल्याची माहिती ट्रस्टचे पदाधिकारी अनिल पोतदार यांनी दिली.

बेळगाव शहरात आज सोमवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. अनिल पोतदार म्हणाले की, शाळेत शिकणाऱ्या श्रीमंत घरातील मुलांना आणि शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांना शाळेच्या फीची तशी फारशी चिंता नसत. परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या गरीब विद्यार्थ्यांना कोणी वाली नसतो. संबंधित मुलांच्या पालकांना त्यांच्या शैक्षणिक शुल्काची मोठी चिंता लागून राहिलेली असते.

त्यासाठी पोद्दार एज्युकेशन ट्रस्ट तर्फे अध्यक्ष दीपक पोतदार आणि चार्टर्ड अकाउंटंट रवी पोतदार यांच्या सल्ल्यानुसार आम्ही बेळगाव शहरातील गरीब विद्यार्थी विद्यार्थिनींचे वार्षिक शैक्षणिक शुल्क भरण्याचा निर्णय घेतला आहे. हे शुल्क काही शाळांमध्ये जास्त आहे कारण त्यांना सरकारी अनुदान मिळत नाही.

 belgaum

त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार भागवण्यासाठी नाईलाजाने त्यांना शैक्षणिक शुल्क वाढवावे लागते. मात्र यामुळे गरीब विद्यार्थी व त्यांच्या पालकांना फार त्रास सहन करावा लागतो. त्यांना दिलासा देण्यासाठी संबंधित मुलांचे वार्षिक शैक्षणिक शुल्क भरण्याची जबाबदारी आमच्या ट्रस्टने घेतली असून ट्रस्टचे चेअरमन अविनाश पोतदार यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध शाळांमधील गरीब गरजू विद्यार्थ्यांची यादी शाळा मुख्याध्यापकांकडून मागवण्यात आली आहे.

सदर यादीत 107 विद्यार्थी विद्यार्थिनींचा समावेश असून यापैकी 50 मुला -मुलींचे वार्षिक शैक्षणिक शुल्क यापूर्वीच भरण्यात आले असून उर्वरित शुल्कांचे वाटप आज केले जाणार आहे असे सांगून गेल्या पाच वर्षात आमच्या ट्रस्टतर्फे प्रायोगिक तत्त्वावर दुर्गम भागातील शाळांमधील मुलांना संबंधित मुख्याध्यापकांच्या विनंतीवरून रेनकोट छत्री वगैरेसह शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले आहे.

हे करत असताना मागील वर्षी दीपक पोतदार व रवी पोतदार यांनी शाळेच्या शैक्षणिक शुल्काबाबतीत बेळगाव शहरातील गरीब विद्यार्थी व त्यांच्या पालकांची होणारी परवड निदर्शनास आणून देऊन ट्रस्टतर्फे आम्ही त्यांचे शैक्षणिक शुल्क भरून त्यांना दिलासा दिला पाहिजे असे सुचवले. त्यानुसार यंदा आम्ही तो उपक्रम राबवत आहोत अशी माहिती अनिल पोतदार यांनी दिली पत्रकार परिषदेस पोतदार एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन अविनाश पोतदार, अध्यक्ष दीपक पोतदार, चार्टर्ड अकाउंटंट रवी पोतदार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.