belgaum

आधुनिक सावित्री: संस्कार, स्वावलंबन आणि एकविसाव्या शतकाचे वास्तव

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :वटपौर्णिमा आली की, सात जन्माच्या सोबतीची प्रार्थना करत वडाला सुताचे वेढे घालणाऱ्या महिलांचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. आपल्या बुद्धीने, चातुर्याने आणि निष्ठेने काळावर मात करून यमाकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवणारी ‘सावित्री’ हे भारतीय संस्कृतीतील स्त्रीशक्तीचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे. आज एकविसाव्या शतकात स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुढे गेली आहे, ती खऱ्या अर्थाने ‘आधुनिक सावित्री’ झाली आहे.

बदल हा काळाचा नियम आहे आणि तो स्वीकारायलाच हवा; पण आजच्या या डिजिटल आणि आधुनिक युगात बदलाच्या नावाखाली जो काही दिखाऊपणा सुरू आहे, त्यावर प्रत्येक स्त्रीने मनापासून आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. कोणाच्याही भावना न दुखावता, आजच्या समाजातील वास्तवाचा स्वीकार करून स्वतःमध्ये वैचारिक प्रगती घडवून आणणे, हीच आजच्या आधुनिक सावित्रीची पहिली पायरी ठरेल.

आजच्या सोशल मीडियाच्या युगात दुर्दैवाने कोणत्याही सणाचे किंवा परंपरेचे स्वरूप व्हॉट्सॲप स्टेटस, इन्स्टाग्राम रील्स आणि फेसबुक पोस्ट्स पुरते मर्यादित झाले आहे की काय, अशी शंका येते. आपण एखादी पूजा का करतो, त्यामागची पार्श्वभूमी काय, निसर्गाचे आणि वडाच्या झाडाचे महत्त्व काय, हे समजून न घेता केवळ ‘नऊवारी साडी आणि भरजरी दागिने’ कॅमेऱ्यासमोर दाखवण्यासाठी रील बनवण्याचा ट्रेंड वाढला आहे. कॅमेऱ्यासमोरचे ते काही सेकंदांचे कृत्रिम हावभाव आणि जास्तीत जास्त ‘लाईक्स’ मिळवण्याची स्पर्धा यामुळे सणांचे मूळ गांभीर्य आणि आंतरिक पावित्र्य कुठेतरी भंग पावत चालले आहे. आधुनिक सावित्रीने केवळ बाह्य प्रदर्शनाचा भाग न बनता, परंपरेचा मूळ गाभा आणि त्यामागची संस्कृती समजून घेणे गरजेचे आहे.

 belgaum

या दिखाऊपणाचा फटका आपल्या निसर्गालाही मोठ्या प्रमाणात बसत आहे. आज सिमेंटच्या जंगलांमुळे निसर्गातील हिरवळ आणि वनराईचा झपाट्याने ऱ्हास होत आहे. सावित्रीने वडाच्या झाडापाशीच सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते, कारण वडाचे झाड हे २४ तास सर्वाधिक ऑक्सिजन देणारे आणि पर्यावरण शुद्ध ठेवणारे झाड म्हणून निसर्गविज्ञानात प्रसिद्ध आहे. परंतु, आज याच वडाच्या झाडाखाली पूजेदरम्यान प्रचंड प्रमाणात अन्नाची आणि साहित्याची नासाडी होताना दिसते.

झाडापाशी ठेवलेली फळे आणि वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य तिथेच सडून जातात, तर पूजेच्या साहित्यासोबत आलेले प्लास्टिकचे वेष्टन मोठ्या प्रमाणात तिथेच पडून राहते. आज आपल्याच समाजात कित्येक लोकांना दोन वेळचे अन्न नशिबी नाही, ही मोठी शोकांतिका आहे. अशा वेळी तिथे अन्न सडवण्यापेक्षा भुकेल्यांना पोटभर खाऊ देणे हीच खरी पूजा फळाला येईल. अलीकडे काही सजग निसर्गप्रेमी आणि काही महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन हा नैवेद्य जमा करण्याचे आणि वडाचा सभोवतालचा परिसर स्वच्छ करण्याचे उपक्रम राबवले आहेत, जे अत्यंत स्तुत्य आहेत. यासोबतच, पूजेच्या वेळी झाडाच्या अगदी जवळ लावल्या जाणाऱ्या उदबत्त्यांमुळे, दिव्यांमुळे आणि उष्णतेमुळे झाडाला मोठी इजा पोहोचते. अनेक ठिकाणी वडाच्या खोडाला गुंडाळलेले सुती धागे पूजेसाठी लावलेल्या दिव्यांमुळे पेट घेतात आणि झाडाला आग लागून मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे वडाचे रक्षण करणे, तिथे स्वच्छता राखणे आणि एक तरी नवीन झाड लावून त्याचे संवर्धन करणे, हीच आजच्या काळातील सर्वात मोठी सत्यवानाची रक्षा आणि पर्यावरण पूजा ठरेल.

स्त्री आज सुशिक्षित झाली, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली, ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. परंतु, या आर्थिक स्वातंत्र्यासोबतच काही ठिकाणी नात्यांमध्ये ‘मीपणा’ आणि ‘अहंकार’ देखील वाढताना दिसत आहे. “मी का ऐकू?”, “माझंही करिअर आहे”, “मी कोणापेक्षा कमी नाही” या ‘मी-मी, तू-तू’ च्या गर्तेत आज अनेक सुशिक्षित दाम्पत्यांचे संसार अडकले आहेत. छोट्या-छोट्या गोष्टीवरून अहंकार दुखावले जातात, संवादाचा अभाव निर्माण होतो आणि परिणामी लग्नसंस्था धोक्यात यायला लागली आहे. आधुनिक सत्यवानासोबत खांद्याला खांदा लावून चालताना, संसारात तडजोड म्हणजे शरणागती नसून तो संसाराचा मजबूत पाया आहे, हे आधुनिक सावित्रीने उमजून घेतले पाहिजे. स्वावलंबी असणे म्हणजे उद्धट असणे नव्हे. आधुनिक सावित्रीने स्वतःचे अस्तित्त्व जपत असतानाच, आपल्या कुटुंबातील नात्यांना प्रेमाचा, आदराचा आणि भावनिक परिपक्वतेचा ओलावा दिला पाहिजे.

कुटुंबाच्या या भावनिक संरक्षणासोबतच त्यांच्या शारीरिक आणि आर्थिक आरोग्याची जबाबदारी घेणे ही देखील आजच्या काळाची गरज आहे. आजच्या धावपळीच्या युगात कामाच्या व्यापामुळे ‘फास्ट फूड’ आणि ‘बाहेरून फूड ऑर्डर’ करण्याची संस्कृती वाढली आहे, ज्याचा थेट परिणाम कुटुंबाच्या तब्येतीवर होत आहे. कमी वयात येणारे हृदयविकाराचे झटके, मधुमेह, रक्तदाब हे आजचे नवे ‘यम’ आहेत, जे कुटुंबाच्या आरोग्यावर टपून बसले आहेत. अशा वेळी बाहेरील खाद्यपदार्थांपेक्षा कुटुंबाला सकस, परिपूर्ण आणि आरोग्यदायी घरगुती आहार देण्याचा संकल्प आधुनिक सावित्रीने केला पाहिजे.

स्वयंपाकघरातील सात्विकता हेच कुटुंबाच्या दीर्घायुष्याचे रहस्य आहे. यासोबतच, कमावती स्त्री केवळ पैसे कमवून थांबता कामा नये, तर ती खऱ्या अर्थाने ‘आर्थिक साक्षर’ झाली पाहिजे. अनपेक्षित संकटाच्या वेळी कुटुंबाला भक्कम आधार देण्यासाठी विमा काढून ठेवणे ही काळाची गरज आहे. केवळ सोने किंवा कपड्यांवर किंवा भौतिक गोष्टींवर अवाजवी खर्च न करता, भविष्यातील आर्थिक स्थैर्यासाठी स्वतःच्या कुटुंबासाठी योग्य गुंतवणूक करणे हीच आधुनिक सावित्रीची खरी चतुराई ठरेल.

थोडक्यात सांगायचे तर, सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी मूळ सावित्रीने यमराजाशी बुद्धीने वाद घातला होता. आजच्या एकविसाव्या शतकातील यमराज वेगळे आहेत—ते म्हणजे बिघडणारे पर्यावरण, खालावणारे आरोग्य, आर्थिक अनिश्चितता, ताणतणाव, अहंकार आणि नात्यांमधील वाढता दुरावा. या आधुनिक यमराजांपासून आपल्या पतीचे आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी आजच्या आधुनिक सावित्रीला दिखाऊपणा सोडून वैचारिक प्रगती करावी लागेल. निसर्गाच्या रक्षणासाठी वृक्ष संवर्धनाचा वसा घ्यावा लागेल, भुकेल्यांना अन्न देऊन खरी माणुसकी जपावी लागेल, आरोग्यदायी आहाराची ढाल आणि आर्थिक साक्षरतेचे अस्त्र परजावे लागेल, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘मीपणा’ सोडून नात्यांमध्ये गोडवा आणावा लागेल. जेव्हा प्रत्येक स्त्री या वास्तवाचा स्वीकार करून स्वतःमध्ये आणि समाजात हा सकारात्मक बदल घडवून आणेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने ‘आधुनिक सावित्री’ हा विचार सार्थ ठरेल.

  • वसुधा सांबरेकर, बेळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.