बेळगाव लाईव्ह:मुजावर गल्ली, बेळगाव येथील ओम विजय पाटील याने बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘मसलमेनिया इंडिया-2026’ प्रादेशिक (रिजनल) अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत चॅम्पियनशिप जिंकली. देशभरातील स्पर्धकांमध्ये सरस कामगिरी करत त्याने बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
या स्पर्धेत ओमने आपल्या उत्कृष्ट शारीरिक तंदुरुस्ती, प्रभावी पोझिंग, स्नायूंची बांधणी आणि मंचावरील आत्मविश्वासाच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकत सर्वाधिक गुण मिळवले.
ओम पाटील यांचे शालेय शिक्षण ज्ञान प्रबोधन मंदिर शाळेत झाले असून, सध्या तो जीआयटी महाविद्यालयात ईएनसी शाखेच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत आहे.
या यशामागे प्रशिक्षक रणजीत किल्लेकर (किल्लेकर जिम) यांचे मार्गदर्शन तसेच वडील विजय पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे ओमने सांगितले. कठोर मेहनत, नियमित सराव आणि जिद्दीच्या बळावर त्याने हे यश संपादन केले आहे.

यापूर्वीही ओमने विविध मसलमेनिया स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले असून, राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करून स्वतःचे आणि बेळगावचे नाव उज्ज्वल करण्याचा त्याचा निर्धार आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल जीआयटी महाविद्यालयासह विविध क्षेत्रांतून ओम पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




