बेळगाव लाईव्ह:
संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघाच्या मुंबईच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ‘बेळगाव लाईव्ह’चे संपादक प्रकाश बेळगोजी यांचा ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे यांच्या हस्ते नुकताच गौरव करण्यात आला.
टिळकवाडी येथील मंगळवार पेठेत असलेल्या ‘बचपन प्ले स्कूल’मध्ये हा सत्कार समारंभ पार पडला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला पत्रकार व ‘बचपन’चे संचालक प्रसाद सु. प्रभू यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले.
सीमावासीयांचा बुलंद आवाज: सुभाष धुमे
यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे म्हणाले की, “संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आचार्य अत्रे यांच्यापासून पत्रकारांनी मोठे योगदान दिले आहे. आधुनिक पत्रकारितेच्या युगातही हाच वारसा पत्रकार जपत आहेत. सीमावासीयांचा बुलंद आवाज असलेल्या प्रकाश बेळगोजी यांना हा सन्मान मिळणे, हा संपूर्ण सीमाभागाचा गौरव आहे.”

तसेच, गेल्या १० वर्षांत सीमाभाग आणि मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी झटत असलेल्या बेळगोजी यांनी ‘बेळगाव लाईव्ह’च्या माध्यमातून केलेली प्रगती कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
‘लोकसेवक’ पुस्तक भेट देऊन सन्मान
याप्रसंगी सुभाष धुमे यांच्या हस्ते प्रकाश बेळगोजी यांना शाल, श्रीफळ आणि १९५२ पासूनच्या गडहिंग्लज मतदारसंघाच्या वाटचालीवर आधारित त्यांनी स्वतः लिहिलेले ‘लोकसेवक’ हे पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला ‘बचपन प्ले स्कूल’चा शिक्षकवृंद आणि इतर मान्यवर उपस्थित होते.




