belgaum

स्वरूपायनमधून प्रा. स्वरूपा इनामदार यांनी उलगडले स्त्रीचे विविध पैलू

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्यावतीने आयोजित ‘कवी समजून घेताना’ या उपक्रमाच्या सातव्या पुष्पात ज्येष्ठ कवयित्री, शब्दगंध कवी मंडळाच्या सदस्या तथा सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा प्रा. स्वरूपा इनामदार यांनी आपल्या कवितांमधून स्त्रीजीवनाचे विविध पैलू प्रभावीपणे उलगडून दाखविले. या कार्यक्रमाला साहित्य प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सरस्वती वाचनालय, कोरे गल्ली, बेळगाव येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शब्दगंध कवी मंडळ संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक अलगोंडी होते. प्रारंभी उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर यांनी प्रस्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला.

त्यानंतर प्रा. स्वरूपा इनामदार यांनी आपल्या कवितांचे रसग्रहण घडवून आणत काव्यनिर्मितीमागील विचारविश्व, अनुभव आणि सामाजिक जाणीवा यांचा उलगडा केला. ‘सहवास’ आणि ‘कविता’ या कवितांमधून शब्दांचे मनोरे रचत कविता कशी जन्म घेते, याचे सुंदर चित्रण त्यांनी केले.

 belgaum

‘हरित क्रांतीच्या जोगवा’ या कवितेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. ‘मी एक स्त्री’ आणि ‘युगा युगातली स्त्री’ या कवितांमधून स्त्रीच्या अस्तित्वाचा, तिच्या संघर्षाचा आणि संसार ते स्वकार या प्रवासाचा वेध घेतला. ‘आम्ही मानकरी’ आणि ‘हाच तर स्त्री जन्म’ या कवितांतून स्त्रीशक्तीचे सामर्थ्य अधोरेखित करण्यात आले.

यावेळी ‘भूक’, ‘नव विचारांसाठी’, ‘कबीर तुका ज्ञाना गवसला’, ‘दोष ना कुणाचा’, ‘फिनिक्स’, ‘मुलीचा जन्म’, ‘खरं पवित्र’, ‘गबाळी’ आणि ‘स्त्री’ या कवितांमधून सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक आशय प्रगल्भतेने व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी झालेल्या काव्यवाचन सत्रात अशोक सुतार, परशुराम खेमणे, नेहा जोशी, स्मिता किल्लेकार, गुरुनाथ किरमटे, मधु पाटील, हर्षदा भातकांडे, शुभदा खानोलकर, गौरी धामणेकर, महादेव खोत, निरंजन सरदेसाई, अस्मिता अळतेकर आणि बसवंत शहापूरकर यांनी आपल्या कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.

कार्यक्रमादरम्यान शब्दगंध कवी मंडळाच्या सदस्या अस्मिता अळतेकर आणि स्मिता किल्लेकार यांची मंथनच्या कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. स्त्रीजीवन, सामाजिक भान, पर्यावरण, मानवी मूल्ये आणि नव्या विचारांचा संगम घडवून आणणारा हा काव्यमय कार्यक्रम साहित्यरसिकांच्या मनावर कायमची छाप उमटवून गेला. शेवटी कवी गुरुनाथ किरमटे यांनी सर्वांचे आभार मानले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.