belgaum

हलगा मच्छे बायपासचा येळळूरला होतोय असाही त्रास

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह:हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामामुळे येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) गावातील मुख्य रस्त्यावर दिवस-रात्र अवजड वाहनांची अतिवेगाने व जबाबदारीशून्य वाहतूक सुरू असल्याने नागरिकामध्ये तीव्र संताप व भीती व्यक्त केली जात आहे.

हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामासाठी येळ्ळूर गावातील मुख्य रस्त्यावर सध्या अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. अवजड वाहने थेट गावातील मुख्य रस्त्यावरून ये -जा करत असल्यामुळे हा रस्ता कांही ठिकाणी खचण्याबरोबरच सर्वत्र खड्डे पडून त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.

अवजड वाहनांच्या अतिवेगाने व जबाबदारीशून्य वाहतुकीमुळे अपघाताचा धोका देखील वाढला आहे. गावातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना एकूण सात शाळा असल्याने शाळकरी मुलांना दररोज धोक्याच्या संपर्कात शाळेला जावे लागत आहेत. दुर्दशा झालेल्या रस्त्याची ताबडतोब दुरुस्ती न केल्यास लवकरच गंभीर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 belgaum

या सर्व पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसांत बायपास कामासाठी आलेली अवजड वाहने अडवून आंदोलन करण्याचा आणि कंत्राटदाराला जाब विचारण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.

त्याचप्रमाणे प्रशासनाने तातडीने बायपास रस्त्याच्या कंत्राटदाराला सूचना देऊन गावातील मुख्य रस्ता तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाकडून तातडीने परिस्थितीचे मूल्यमापन करून आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या जातील अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.