बेळगाव लाईव्ह: श्रीराम आणि श्रीकृष्ण हे भारतीय संस्कृतीचे प्राण असून रामकथेचा प्रभाव आज जगभर पोहोचला आहे. जगातील अनेक प्रमुख भाषांमध्ये रामायणाचे अनुवाद झाले असून अनेक पौर्वात्य देशांनीही आपापल्या पद्धतीने रामकथा स्वीकारली आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय प्रवचनकार, साहित्यिक आणि व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.
केळकर बाग येथील श्री काणे महाराज राम मंदिरात अधिकमासानिमित्त आयोजित श्रीराम कथा प्रवचनमालेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी रामायणाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकत भारतीय संस्कृतीतील श्रीरामांचे स्थान अधोरेखित केले.
डॉ. शेवडे म्हणाले, समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे रामकथा ब्रह्मांड भेदून गेली असून आजही तिची मोहिनी जगभरातील लोकांवर कायम आहे. वाल्मिकी हे श्रीरामांचे समकालीन असल्यामुळे त्यांनी लिहिलेले रामायण हे सर्वाधिक अधिकृत मानले जाते. हजारो वर्षांपूर्वी घडलेली ही कथा आजही समाजाला प्रेरणा देत आहे.
श्रीराम हे केवळ नीतिमान आणि धर्माचरणी राजे नव्हते, तर अन्यायाविरुद्ध शस्त्र उचलणारे योद्धेही होते, असे सांगताना त्यांनी रावणवधाचा संदर्भ दिला. “सीतेच्या सुटकेसाठी श्रीरामांनी लंकेच्या सीमेवर जाऊन उपोषण केले नाही, तर धनुष्यबाण हातात घेऊन रावणाचा पराभव केला,” असे ते म्हणाले.

अयोध्येच्या वर्णनाद्वारे त्यांनी प्राचीन भारतीय शिल्पकला, वास्तुशास्त्र आणि सांस्कृतिक वैभव यांचाही वेध घेतला. रामायणातील विविध प्रसंग, त्यामागील ऐतिहासिक संदर्भ आणि सांस्कृतिक मूल्ये यांची त्यांनी रसाळ शैलीत उकल केली.
केळकर बागेतील श्री काणे महाराज राम मंदिरात दररोज सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत सुरू असलेल्या या रामकथा प्रवचनमालेस भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.



