बेळगाव लाईव्ह : अतिरिक्त अबकारी आयुक्त वाय. मंजुनाथ यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तब्बल २४ तास सुरू ठेवलेल्या झडतीत महत्त्वाचे दस्तऐवज आणि माहिती हाती लागल्याची माहिती समोर आली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांचे मेहुणे असलेल्या मंजुनाथ यांच्या घरी काल सकाळी सुरू झालेली कारवाई आज सकाळी संपली.
शहरातील टीव्ही सेंटर परिसरातील निवासस्थानी बुधवारी पहाटे साडेपाच वाजता सुरू झालेली झडती गुरुवारी सकाळी सुमारे सहा वाजेपर्यंत सुरू होती. या काळात ईडीचे अधिकारी घराबाहेर न पडता घरातच दस्तऐवजांची छाननी करत होते. तसेच मंजुनाथ यांच्या पत्नीचीही चौकशी करून विविध मुद्द्यांवर माहिती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

झडतीदरम्यान बेनामी बार परवान्यांशी संबंधित कागदपत्रे, कथित बेकायदेशीर मालमत्तेची माहिती तसेच सोने-चांदी आढळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत ईडीकडून अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
बेळगावातील सहा ठिकाणांसह राज्यातील एकूण दहा ठिकाणी एकाच वेळी करण्यात आलेल्या ईडीच्या कारवाईत महत्त्वाची कागदपत्रे आणि पुरावे हाती लागल्याचेही समजते. या प्रकरणातील पुढील तपास ईडीकडून सुरू आहे.




