बेळगाव लाईव्ह : नागरिकांना आधारसंबंधित सेवा अधिक सुलभ आणि जलद मिळाव्यात यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) तर्फे भाग्यनगर, अनगोळ येथे नवीन आधार सेवा केंद्र (Aadhaar Seva Kendra) सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते करण्यात आले.
नवीन आधार सेवा केंद्रात नवीन आधार नोंदणी, नाव-पत्ता व इतर तपशीलांमध्ये दुरुस्ती, मोबाईल क्रमांक व ई-मेल अपडेट, बायोमेट्रिक अपडेट तसेच आधारसंबंधित विविध सेवांचा लाभ नागरिकांना मिळणार आहे.
हे केंद्र सीटीएस क्रमांक ४११७, ब्रह्मा अपार्टमेंट, भाग्यनगर फर्स्ट क्रॉस, अंगोळ, बेळगाव येथे सुरू करण्यात आले आहे. उद्घाटन कार्यक्रमात UIDAI चे उपसंचालक आनंद व्ही. यांनी केंद्रातील उपलब्ध सेवांची माहिती दिली. तसेच UIDAI व्यवस्थापक मोहम्मद मुसाब यांनी ऑनलाइन अपॉइंटमेंट बुकिंग प्रक्रिया आणि नवीन आधार मोबाईल अॅपची माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी नागरिकाभिमुख सेवा देण्यावर भर देत तक्रारींचे त्वरित निराकरण आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. कार्यक्रमादरम्यान आधार नोंदणी व अपडेट प्रक्रियेचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.
या नवीन आधार सेवा केंद्रामुळे बेळगाव शहरासह परिसरातील नागरिकांना आधारसंबंधित सेवांसाठी अधिक सोयीस्कर सुविधा उपलब्ध होणार आहेत.




