बेळगाव लाईव्ह : बेळगावजवळील हिंडाल्को कंपनीत कार्यरत असलेल्या २४ वर्षीय तरुण कामगार शंकर तळवार याने कंत्राटदाराच्या त्रासाला आणि पाच लाख रुपयांच्या लाचेच्या मागणीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नोकरी टिकवण्यासाठी एवढी मोठी रक्कम देणे शक्य नसल्याने हताश झालेल्या शंकरने गळफास घेण्यापूर्वी व्हॉट्सॲप स्टेटसवर आपली व्यथा मांडली होती. या घटनेची माहिती मिळताच मुत्त्यानट्टी गावातील ग्रामस्थ आणि मृत तरुणाच्या नातेवाईकांनी हिंडाल्को कंपनीच्या आवारात तीव्र निदर्शने करत दगडफेक केली, ज्यामुळे परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि स्थानिक आमदार आसिफ सेठ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, तसेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी शंभरहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करून माळमारुती पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली. स्थानिक नागरिकांनी जमिनी देऊनही बाहेरील लोकांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप करत वाल्मिकी समाजाच्या नेत्यांनी पीडित कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी कारखाना व्यवस्थापनासोबत सुमारे एक तास प्रदीर्घ आणि सकारात्मक चर्चा घडवून आणली, ज्यामध्ये मृत शंकरच्या दोन्ही भावांना त्यांच्या आयटीआय पात्रतेनुसार आजच कंपनीत कायमस्वरूपी नोकरी देण्याचे मान्य करण्यात आले. व्यवस्थापनाकडून योग्य नुकसानभरपाई देण्याचे निश्चित करण्यात आले असून, आमदार आसिफ सेठ यांनीही आपल्या वैयक्तिक निधीतून कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर केली आहे.
केवळ पीडित कुटुंबालाच नव्हे, तर परिसरातील पाच गावांतील प्रमुख तरुणांना रोजगार देण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेची यादी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, पुढील पाच दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या उपस्थितीत या नोकऱ्यांबाबत पारदर्शक चर्चा करून स्थानिक तरुणांना प्राधान्य दिले जाईल. या संपूर्ण प्रकरणावर तोडगा काढत, संबंधितांना नियुक्ती आदेश प्रत्यक्ष हातात देऊनच आपण कंपनी आवारातून बाहेर पडणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यामुळे संतप्त ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.




