belgaum

काजू मंडळ विभागीय कार्यालयासह महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : चंदगड येथे काजू मंडळाचे विभागीय कार्यालय तसेच काजू उद्योगाशी संबंधित विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या प्रकल्पामुळे कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागातील, विशेषतः बेळगाव जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या संदर्भात चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी मुंबई येथे पणन मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी चंदगड येथे काजू मंडळाचे विभागीय कार्यालय, अत्याधुनिक नर्सरी, काजूसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स, काजू प्रक्रिया प्रकल्प, निर्यात केंद्र, आधुनिक गोदाम तसेच काजू बाजार समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली.

याशिवाय शिनोळी बुद्रुक औद्योगिक वसाहतीत महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे कृषी उत्पादन निर्यात केंद्र उभारण्याचाही प्रस्ताव सादर करण्यात आला. या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत हलकर्णी (ता. चंदगड) येथे सुमारे ४० एकर जागा शासनामार्फत नाममात्र शुल्कात उपलब्ध करून देण्याबाबत मंत्री जयकुमार रावल यांनी आश्वासन दिले. तसेच संबंधित प्रकल्पांच्या प्रशासकीय प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 belgaum

चंदगड हा राज्यातील प्रमुख काजू उत्पादक तालुक्यांपैकी एक असून प्रक्रिया, साठवणूक आणि निर्यातीच्या सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित आर्थिक लाभ मिळत नव्हता. आता हे सर्व प्रकल्प साकार झाल्यास काजू उत्पादनापासून प्रक्रिया आणि निर्यातीपर्यंतची संपूर्ण साखळी एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

या प्रकल्पामुळे चंदगडसह कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागातील, विशेषतः बेळगाव परिसरातील काजू उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून आमदार शिवाजीराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळावे, अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.