belgaum

कण्हेरी मठाधिपतींच्या बसवकल्याणमधील नियोजित परिषदेला तीव्र विरोध

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कोल्हापूर जिल्ह्यातील कण्हेरी मठाचे मठाधिपती श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या बसवकल्याण येथील नियोजित हिंदू परिषदेला लिंगायत आणि बसवप्रेमी संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. २८ जून रोजी होणाऱ्या या कार्यक्रमामुळे परिसरातील सामाजिक सलोखा आणि शांतता बिघडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

या पार्श्वभूमीवर, बसवप्रेमी संघटनांच्या वतीने बेळगावच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सरकारला एक विशेष मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. या परिषदेवर तात्काळ बंदी घालावी आणि कण्हेरी मठाधिपतींना बसवकल्याणमध्ये प्रवेश करू देऊ नये, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष बसवराज रोट्टी यांनी कण्हेरी मठाच्या स्वामीजींवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. लिंगायत महासभेच्या आदरणीय गुरूंचा आणि ज्येष्ठ नेत्यांचा स्वामीजींकडून सातत्याने अवमान केला जात असून, यामुळे समाजातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

 belgaum

सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारच्या कारवायांवर आणि वक्तव्यांवर आधीच आक्षेप घेतला असतानाही हे प्रकार थांबलेले नाहीत, याकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. महात्मा बसवेश्वरांच्या पवित्र ‘अनुभव मंटप’ परिसरात शरणांच्या मूळ विचारसरणीच्या विरोधात ही परिषद घेतली जात असल्याने संपूर्ण लिंगायत समाजात संतापाचे वातावरण आहे.

दुसरीकडे, बसवप्रेमी कार्यकर्ते शंकर गुडस यांनी कण्हेरी मठाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कण्हेरी मठाची मूळ परंपरा ही अवैदिक असतानाही, स्वामीजी अशा उपक्रमांच्या माध्यमातून समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आम्हाला हिंदू परिषदेला वैयक्तिक विरोध नाही, मात्र बसवादी शरणांच्या महान तत्त्वांना आणि लिंगायत समाजाच्या धार्मिक भावनांना धक्का पोहोचू नये, हीच आमची मुख्य भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे निवेदन देताना बसवप्रेमी संघटनांचे अनेक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लिंगायत समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संवेदनशील प्रकरणाची दखल घेऊन प्रशासनाने त्वरित ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.