बेळगाव लाईव्ह : बेळगावचे अतिरिक्त अबकारी आयुक्त आणि आपले मेहुणे वाय. मंजुनाथ यांच्या निवासस्थानांवर पडलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या छाप्याबाबत आपल्याला पूर्वकल्पना नव्हती, असे स्पष्टीकरण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले आहे.
ही कारवाई नेमकी कोणत्या कारणासाठी करण्यात आली आहे याचा अधिकृत अहवाल आल्यानंतरच आपण भाष्य करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, राज्यातील बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सूचक संकेत देताना त्यांनी सांगितले की, जून महिन्यात विस्तार होण्याची शक्यता कमी असून हा निर्णय आता जुलैमध्ये घेतला जाऊ शकतो. सध्या अशोक पट्टण, मतीन कौजलगी आणि गणेश हुक्केरी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत, मात्र यावर अंतिम शिक्कामोर्तब काँग्रेस हायकमांडच करेल.

जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी नागरिकांना दिलासा दिला असून हिडकल जलाशयामध्ये सध्या मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याचे सांगितले.
यामुळे आगामी १५ दिवस पिण्याच्या पाण्याची कोणतीही टंचाई भासणार नाही, अशी ग्वाही देत पाऊस लांबल्यास शेतीसाठी पर्यायी व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन सतीश जारकीहोळी यांनी दिले.




