बेळगाव लाईव्ह :बेळगाव मध्यवर्ती बस स्थानक (सीबीटी) परिसरात काल मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी मार्केट पोलिसांनी छापेमारी करून गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका महिलेसह दोघा जणांना अटक केली. तसेच त्यांच्या जवळील 5 हजार रुपयांहून अधिक किमतीची दारू जप्त केली.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये एका महिलेसह कल्पेश परप्पा नंदगांव (वय 43, रा. रविवार पेठ, गोकाक) याचा समावेश आहे. कल्पेश हा काल मंगळवारी बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकाजवळ सार्वजनिक ठिकाणी कोणताही परवाना नसताना बेकायदेशीररित्या गोवा बनावटीच्या दारूची विक्री करत होता.
त्यावेळी मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनीकंठ पुजारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी छापा टाकून आरोपीला ताब्यात घेण्याबरोबरच त्याच्याकडील विविध कंपन्यांची एकूण 1,730 रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या. दुसऱ्या प्रकरणात सीबीटीजवळ अन्य एका सार्वजनिक ठिकाणी फक्त गोवा राज्यामध्येच विक्रीची परवानगी असलेल्या दारूची विक्री करणाऱ्या महिलेला मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हुसेनसाब केरुर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अटक केली.
तसेच तिच्या जवळील विविध कंपन्यांच्या एकूण 4,152 रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या. बेळगाव मध्यवर्ती बस स्थानक परिसरात सार्वजनिक ठिकाणी गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका महिलेसह एकूण चौघाजणांना गेल्या सोमवारी मार्केट पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर लगेच काल मंगळवारी वरीलप्रमाणे आणखी दोघांना अटक करण्यात आली. उपरोक्त दोन्ही प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.




