belgaum

समाजाची नाडी पकडा, नाहीतर लोक पर्याय शोधतील : ऋषीकेश देसाई

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमे लोकांचे प्रश्न मांडण्यात अपयशी ठरल्यामुळे लोकांनी टीव्ही आणि सोशल मीडियाचा पर्याय निवडला. मात्र, जर डिजिटल प्लॅटफॉर्म्सनीही जनसामान्यांच्या दैनंदिन समस्या मांडल्या नाहीत, तर लोक भविष्यात या माध्यमांनाही नाकारून नवीन पर्याय शोधतील, असे मत ‘द हिंदू’चे प्रतिनिधी ऋषीकेश देसाई यांनी व्यक्त केले.

डिजिटल मीडिया असोसिएशनच्या वतीने शासकीय विश्राम धमात आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.

आजच्या पत्रकारितेसमोर सरकार, समाज आणि विज्ञान-तंत्रज्ञान ही मुख्य क्षेत्रे आहेत. मात्र, तंत्रज्ञान आणि विज्ञानासारखे क्लिष्ट विषय सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवण्यात पत्रकार कमी पडत आहेत. आपण सर्वजण ‘इस्रो’बद्दल अभिमान बाळगतो, पण त्यांचे तंत्रज्ञान नेमके कसे काम करते, हे सर्वसामान्यांना समजावून सांगणारे जर्नलिस्ट आज दुर्मिळ झाले आहेत.

 belgaum

समाजात वाढणाऱ्या आरोग्याच्या समस्यांकडेही माध्यमांचे दुर्लक्ष होत आहे. आज मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या प्रत्येक तीन महिलांमागे एका महिलेला सांधेदुखीचा त्रास आहे, पण यावर डिजिटल पोर्टल किंवा वर्तमानपत्रांमध्ये सखोल विश्लेषण पाहायला मिळत नाही. जोपर्यंत माध्यमं समाजाची नाडी पकडणार नाहीत, तोपर्यंत लोक त्यांच्याशी जोडले जाणार नाहीत.

नुकत्याच झालेल्या परीक्षांमधील गोंधळाचे उदाहरण देत ते म्हणाले, ‘नीट’ परीक्षेतील पेपर फुटीचा मुद्दा सर्वच माध्यमांनी उचलला, कारण ‘पेपर लीक’ रिपोर्टर्सना सहज समजतो. मात्र, त्याच वेळी ‘सीबीएसई’च्या ‘ऑन-स्क्रीन इव्हॅल्युएशन’ सॉफ्टवेअरमधील मोठा बिघाड माध्यमांना मांडता आला नाही. नीटपेक्षा तिप्पट विद्यार्थी सीबीएसईमध्ये आहेत, तरीही या तांत्रिक गोंधळावर वाहिन्यांनी चर्चा केली नाही. आपण क्लिष्ट विषय समजून घेण्यात कमी पडत आहोत.

१९९८ मधील एका सेमिनारचा संदर्भ देत देसाई यांनी सांगितले की, त्याकाळी वृत्तपत्राच्या संपादकांनी टीव्ही कधीही वृत्तपत्राची जागा घेऊ शकत नाही असे म्हटले होते, कारण टीव्ही घेऊन फिरता येत नव्हते. मात्र, आज मोबाईल स्क्रीनमुळे ती समस्या संपली आहे. लॉकडाऊननंतर घरातील प्रत्येकाच्या हातात वैयक्तिक स्क्रीन आली आहे आणि तंत्रज्ञानाने व्यावहारिक गरजा पूर्ण केल्या आहेत. सोशल मीडिया हा माहितीचा अंतिम स्त्रोत आहे अशा भ्रमात पत्रकारांनी राहू नये, असा इशारा त्यांनी शेवटी दिला. जर आपण लोकांच्या रोजच्या जगण्याशी निगडित प्रश्न आणि तांत्रिक बदल वेळेत मांडू शकलो नाही, तर लोक त्यांच्या माहितीसाठी तिसराच एखादा नवीन मार्ग शोधून काढतील, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बेळगावमधील विविध डिजिटल मीडियाचे संपादक, प्रतिनिधी आणि वार्ताहर उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.