belgaum

“महाराष्ट्राकडेच पाणी नाही, मग बेळगावला कसे देणार?”

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याबाबत नागरिकांनी चिंता करण्याचे कारण नसून पुढील दोन महिन्यांसाठी पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याचा दिलासा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिला. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला.

पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर बोलताना जारकीहोळी म्हणाले, “यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक धरणांमध्येही पाणीसाठा घटला आहे. महाराष्ट्र शासनाकडेच पुरेसा पाणीसाठा नसताना ते आम्हाला पाणी कसे सोडतील? मात्र, बेळगावकरांनी घाबरण्याचे कारण नाही. सध्या शहराला कोणतीही गंभीर पाणीटंचाई नाही.”

ते पुढे म्हणाले, “हिदकल आणि राकसकोप्प जलाशयांमध्ये पुढील दोन महिन्यांसाठी पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे बेळगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीचा नाही. प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.”

 belgaum

यावेळी जय किसान भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत निवेदन सादर केले. तसेच अॅड. लातूर यांच्या नेतृत्वाखाली संगोळी रायान्ना पतसंस्थेच्या ठेवीदारांनीही भेट घेत आपल्या अडचणी मांडल्या. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बेंगळुरूमध्ये बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन जारकीहोळी यांनी दिले.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील विविध विकासकामांचा आढावा घेत त्यांनी प्रशासनाला कामांना गती देण्याच्या सूचनाही केल्या. जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासनाशी चर्चा करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसराच्या नूतनीकरण कामांना गती
मंत्र्यांसह विविध अधिकाऱ्यांकडून कामाची पाहणी

बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सुरू असलेल्या विविध विकासकामांची आणि सौंदर्यीकरणाची सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी मंगळवारी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि हे काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

कार्यालय आवारात उभारण्यात येत असलेल्या नवीन ध्वजस्तंभाच्या कामाची मंत्र्यांनी पाहणी केली. तसेच ऐतिहासिक ‘हल्मिडी शिलालेखा’च्या प्रतिकृतीच्या संरक्षणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. नागरिकांच्या सोयीसाठी सुसज्ज रस्ते आणि पार्किंग व्यवस्था केली जात असून, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी नकाशाच्या माध्यमातून या आराखड्याची माहिती पालकमंत्र्यांना दिली.

या वेळी जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे, जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.