बेळगाव लाईव्ह :नानावाडी, बेळगाव येथे सार्वजनिक ठिकाणी गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तिघा युवकांना टिळकवाडी पोलिसांनी काल अटक करून त्यांच्या जवळील 448 ग्रॅम गांजासह एकूण 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे मंगेश दयानंद तळेकर (वय 29, रा. क्रांतीनगर गणेशपुर बेळगाव), विजय चंद्रपाल चव्हाण (वय 26, रा. गणेशपुर बेळगाव) आणि संदीप मारुती घोटगे (वय 20, रा. सावगाव बेळगाव) अशी आहेत. हे तिघेही जण सोमवारी नानावाडी येथील रायकर फर्निचर जवळ सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या फायद्यासाठी गांजा या अंमली पदार्थाची विक्री करत होते.
त्यावेळी टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून तिघाही आरोपींना रंगेहात पकडले. तसेच त्यांच्या जवळील 20 हजार रुपये किमतीचा 448 ग्रॅम गांजा, 20 हजार रुपये किमतीची स्प्लेंडर दुचाकी आणि 5 हजार रुपयांचा मोटोरोला मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.
बेळगाव सीबीटी जवळ बेकायदा दारू विक्री : महिलेसह 4 जणांना अटक
बेळगाव मध्यवर्ती बस स्थानक (सीबीटी) परिसरात सार्वजनिक ठिकाणी गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका महिलेसह एकूण चौघा जणांना मार्केट पोलिसांनी काल सोमवारी अटक केली तसेच त्यांच्या जवळील सुमारे 14.5 हजार रुपये किमतीची बेकायदेशीर दारू जप्त केली.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये यल्लाप्पा द्यामप्पा तळवार (वय 45, रा. मळ्ळूर, ता. सौंदत्ती जि. बेळगाव), बाळाप्पा संक्रप्पा भंडारी (वय 30), नुरोंदप्पा यमनप्पा बन्ने (वय 29 दोघेही रा. वडीगेरी, ता. इलकल बागलकोट) आणि एका महिलेचा समावेश आहे. यापैकी यल्लाप्पा तळवार हा काल मध्यवर्तीय बस स्थानकाजवळ सार्वजनिक ठिकाणी कोणताही परवाना नसताना स्वतःच्या फायद्यासाठी फक्त गोवा राज्यातच विक्रीची परवानगी असलेल्या दारूची अवैध विक्री करत होता. त्यावेळी मार्केट पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुक्मिणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून याला यल्लाप्पा याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्या जवळील 660 रुपये किमतीची 2 लिटर 250 मिली हनीबी प्रीमियम ब्रँडी, 3,610 रुपये किमतीच्या बुलेट 77 काजूफेनीच्या 95 बाटल्या असा एकूण 4,270 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दुसऱ्या प्रकरणात मध्यवर्तीय बस स्थानका जवळ अन्य एका सार्वजनिक ठिकाणी बाळप्पा आणि नुरोंदप्पा हे गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर विक्री करत होते.
त्यांना मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनीकंट पुजारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अटक करून त्यांच्या जवळील 5,120 रुपये किमतीची विविध कंपन्यांची 42 लिटर दारू जप्त केली. त्याचप्रमाणे पुन्हा मध्यवर्तीय बस स्थानका जवळच अन्यत्र सार्वजनिक ठिकाणी गोवा बनावटीच्या दारूची विक्री करणाऱ्या एका महिलेला मार्केट पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक रुक्मिणी व त्यांच्या सहकार्याने रंगेहात पकडले. तसेच त्या महिलेजवळील एकूण 5,200 रुपये किमतीची विविध कंपन्यांची 33 लिटर गोवा बनावटीची दारू जप्त केली. उपरोक्त तीनही प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.




