belgaum

कडेकोट पोलीस बंदोबस्त; २६०० अधिकारी-कर्मचारी तैनात

0
Cop bgm
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्योत्सवानिमित्त आज, रविवार १ नोव्हेंबर रोजी बेळगाव शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्योत्सव मिरवणूक आणि विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने व्यापक सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. शहरात सुमारे २६०० पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड तैनात करण्यात आले असून, केएसआरपी आणि सीएआरच्या एकूण १८ तुकड्यांसह एसडीआरएफचे पथकही सज्ज ठेवण्यात आले आहे.

बेळगाव शहर पोलीस आयुक्त कार्यालयाने यासंदर्भात प्रसिद्धिपत्रक जारी करून बंदोबस्ताची सविस्तर माहिती दिली आहे. शहर पोलीस दलातील ३ डीसीपी, ६ एसीपी, २० पोलीस निरीक्षक, ९८ पीएसआय आणि एएसआय तसेच ५२८ पोलीस कर्मचाऱ्यांची बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय अन्य जिल्हे आणि पोलीस विभागांतून ८ डीएसपी, ४८ पोलीस निरीक्षक, २०६ पीएसआय आणि एएसआय, १२७० पोलीस कर्मचारी तसेच ४०० होमगार्ड मागविण्यात आले आहेत.

मिरवणूक मार्गावर ड्रोन आणि सीसीटीव्हीची करडी नजर

 belgaum

बेळगाव शहरात सुमारे २५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे असून, राज्योत्सव मिरवणूक मार्ग आणि अतिसंवेदनशील ठिकाणांवर आणखी ५४० अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मिरवणुकीतील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी चार ड्रोन कॅमेरे आणि १८ व्हिडिओग्राफरची नियुक्ती करण्यात आली आहे. संभाव्य घातपाती कारवाया रोखण्यासाठी दोन विशेष पथकेही तैनात करण्यात आली आहेत.

शहरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी १२ गुन्हेगारी नियंत्रण पथके, धारदार शस्त्रांच्या साहाय्याने होणारे हल्ले रोखण्यासाठी १२ अँटी स्टॅबिंग पथके आणि अमली पदार्थांची तपासणी करण्यासाठी पाच विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

सोशल मीडियावर २४ तास नजर

राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या संदेशांवरही पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. यासाठी १३ स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली असून, ही पथके चोवीस तास कार्यरत आहेत. मिरवणुकीदरम्यान ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विशेष पथकांकडून डीजे आणि ध्वनिक्षेपक यंत्रणांची तपासणी केली जाणार आहे.

३२ विभागांत शहराची विभागणी; विशेष गस्त व्यवस्था

सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने संपूर्ण बेळगाव शहराची ३२ सेक्टरमध्ये विभागणी करण्यात आली आहे. विविध भागांत गस्त घालण्यासाठी ३३ शक्ती वाहने, १५ होयसळ वाहने आणि ९ महामार्ग गस्त वाहने तैनात करण्यात आली आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देता यावा, यासाठी दोन ठिकाणी रुग्णवाहिका आणि दोन ठिकाणी अग्निशमन दलाची वाहने सज्ज ठेवण्यात आली आहेत.

पोलीस प्रशासनाने महानगरपालिका, हेस्कॉम, वन विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अन्य संबंधित विभागांशी समन्वय साधून बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

७५ ठिकाणी बॅरिकेडिंग; वाहतुकीत बदल

राज्योत्सव मिरवणुकीमुळे शहरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन ७५ ठिकाणी बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनांच्या पार्किंगसाठी चार स्वतंत्र ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. शहरातील काही प्रमुख मार्गांवरील वाहतूक अन्य मार्गांवर वळविण्यात आली आहे.

राज्योत्सव मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पडावी, यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्यात आली असून, नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन बेळगाव शहर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.