बेळगाव लाईव्ह : सणासुदीच्या काळात बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ वाढत असताना बेळगाव महानगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे व्यापारी आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत ठिकठिकाणी सुरू असलेल्या खोदकामांमुळे ग्राहकांची ये-जा अडचणीची बनत असून, याचा थेट परिणाम स्थानिक व्यापारावर होण्याची भीती व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, खडे बाजार, समाधेवी गल्ली, रामदेव गल्ली आणि पांगुळ गल्ली या परिसरात बेळगावची प्रमुख बाजारपेठ विस्तारलेली आहे. अशा मर्यादित बाजारपेठेतच सणासुदीच्या काळात विविध ठिकाणी खोदकामे सुरू असल्याने व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.
विशेष म्हणजे, समादेवी गल्ली–गोंधळी गल्ली कॉर्नर येथेही पाईपलाईनला गळती लागल्याने जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम सुरू करण्यात आले आहे. आधीच बाजारपेठेतील विविध भागांत खोदकाम सुरू असताना आणखी एका महत्त्वाच्या चौकात रस्ता खोदण्यात आल्याने वाहतुकीचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
एकीकडे सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापारी दुकाने सजवत असताना दुसरीकडे रस्ते खोदाई आणि बॅरिकेडिंगमुळे ग्राहक बाजारपेठेत येण्यास टाळाटाळ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर आर्थिक परिणाम होऊ शकतो.
यापूर्वीही व्यापारी संघटनेने बाजारपेठेतील रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करू नयेत, अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती. वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी वन-वे व्यवस्था लागू करावी आणि आवश्यक ठिकाणी वाहतूक पोलिस तैनात करावेत, असा पर्यायही व्यापाऱ्यांनी सुचवला होता.
मात्र, या मागण्यांची दखल घेऊन बाजारपेठेतील परिस्थिती सुधारण्यासाठी प्रशासनाकडून कोणती ठोस पावले उचलली जाणार, हा प्रश्न कायम आहे.
पाईपलाईनची दुरुस्ती आणि आवश्यक विकासकामांना कोणाचाही विरोध नाही. मात्र, अशा कामांचे नियोजन सणासुदीचा काळ लक्षात घेऊन करता येत नाही का? ग्राहकांसाठी बाजारपेठेतील रस्ते खुले ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची नाही का?
बाजारपेठेतील ग्राहकांची वाट अडवून स्थानिक व्यापाऱ्यांना अडचणीत आणले जात असल्याची भावना निर्माण होत असेल, तर त्याची जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाने घ्यायला हवी. स्मार्ट सिटीच्या घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामांमध्ये नियोजन आणि समन्वय दाखवण्याची गरज आहे.
शेवटी प्रश्न एकच… बेळगावची पारंपरिक बाजारपेठ टिकवायची आहे की नियोजनाच्या अभावामुळे ग्राहकांना मॉल आणि बाहेरील व्यावसायिक केंद्रांकडे जाण्यास भाग पाडायचे आहे?
महानगरपालिका प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन सुरू असलेल्या कामांचे योग्य नियोजन करावे आणि सणासुदीच्या काळात बाजारपेठेतील रस्ते ग्राहकांसाठी खुले ठेवावेत, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.




