बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील शहापूर परिसरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीवरील मागील प्रवासी जखमी झाला आहे.
शहापूर येथील आयुर्वेदिक के एल ई महाविद्यालयासमोर सायंकाळी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
नाथ पै सर्कलकडून गोवा वेसच्या दिशेने जाणाऱ्या बुलेट दुचाकीची एका कारला धडक बसली. धडकेनंतर दुचाकीस्वाराचा ताबा सुटून तो रस्त्यावर पडला. याचवेळी समोरून येणाऱ्या ऑइल टँकरचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की मृत व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.दुचाकीवरील मागील प्रवासी रस्त्याच्या कडेला फेकला गेल्याने तो जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वृत्त लिहिपर्यंत मृत व्यक्तीची ओळख पटलेली नव्हती.

घटनेची माहिती मिळताच रहदारी दक्षिण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविला. या अपघातानंतर शहरातील गर्दीच्या भागातून दिवसा अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.




