बेळगाव लाईव्ह : बेळगाव हे केवळ सीमाप्रश्नासाठी ओळखले जाणारे शहर नाही, तर या शहराला समृद्ध ऐतिहासिक वारसाही लाभला आहे. मराठेशाहीपासून ब्रिटिश राजवटीपर्यंतच्या अनेक ऐतिहासिक घडामोडींच्या पाऊलखुणा आजही बेळगावच्या भूमीत पाहायला मिळतात. मात्र, बदलत्या काळाबरोबर या ऐतिहासिक खुणा एकामागून एक इतिहासाच्या पानांमध्ये जमा होत आहेत. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला असून, शहरातील ब्रिटिशकालीन सब रजिस्ट्रार कार्यालयाची जुनी इमारत जमीनदोस्त करण्याचे काम सुरू झाले आहे.
ब्रिटिशकालीन स्थापत्यशैलीचा वारसा लाभलेल्या या इमारतीने अनेक दशके नागरिकांना सेवा दिली. असंख्य नागरिकांच्या मालमत्तांच्या नोंदी, खरेदी-विक्रीचे व्यवहार आणि पिढ्यान्पिढ्यांच्या आठवणी या वास्तूशी जोडलेल्या आहेत. अनेकांसाठी ही केवळ सरकारी कार्यालयाची इमारत नव्हती, तर बेळगावच्या जुन्या शहराची ओळख सांगणारी एक ऐतिहासिक खूण होती.
बेळगाव शहराला ब्रिटिश राजवटीचा मोठा इतिहास आहे. विशेषतः कॅम्प आणि कॅन्टोन्मेंट परिसर हा ब्रिटिशांच्या नियोजनबद्ध वसाहतीचा महत्त्वाचा भाग होता. लष्करी आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून बेळगावला ब्रिटिशांच्या काळात विशेष महत्त्व होते. त्यामुळे आजही शहरातील अनेक भागांमध्ये ब्रिटिशकालीन वास्तू, रस्ते आणि स्थापत्यशैलीच्या पाऊलखुणा पाहायला मिळतात.
आता जीर्ण झालेल्या सब रजिस्ट्रार कार्यालयाच्या इमारतीचे पाडकाम सुरू झाले असून, हे काम पूर्ण करण्यासाठी जवळपास एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. याच जागेवर आधुनिक तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त नवीन सब रजिस्ट्रार कार्यालय उभारण्यात येणार आहे. दरम्यान, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले असून, तेथून नियमित कामकाज सुरू आहे.

नवीन इमारतीच्या उभारणीमुळे प्रशासकीय सुविधांमध्ये सुधारणा होणार असली, तरी या जुन्या वास्तूच्या जाण्याने शहराच्या ऐतिहासिक वारशातील आणखी एक पान बंद झाले आहे.
शहराचा विकास आवश्यकच; मात्र विकासाच्या वाटेवर इतिहासाच्या खुणा जपण्याची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. कारण इमारती पाडता येतात, नव्या वास्तू उभारता येतात; पण त्या जुन्या भिंतींमध्ये दडलेल्या आठवणी आणि इतिहास पुन्हा निर्माण करता येत नाहीत!




