बेळगाव लाईव्ह: खानापूर शिवाजीनगर परिसरात सोमवारी झालेल्या दुचाकी अपघातातील गंभीर जखमी सेवानिवृत्त पोस्टमास्तर मारुती नारायण दळवी (68) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मणतुर्गा गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार दि. 22 जून रोजी शिवाजीनगर येथे दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात मारुती दळवी गंभीर जखमी झाले होते. भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने त्यांच्या वाहनाला मागून जोरदार धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने बेळगाव येथील केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रुग्णालयात डॉक्टरांकडून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने उपचारांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही आणि अखेर मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

मारुती दळवी यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित पुत्र, एक विवाहित कन्या तसेच भाऊ-बहिणी असा परिवार आहे. ते महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांचे बंधू होत.
त्यांच्यावर आज मंगळवार दि. 23 जून रोजी रात्री 8 वाजता त्यांच्या मूळ गावी मणतुर्गा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान, शिवाजीनगर परिसरात वारंवार अपघात घडत असल्याने स्थानिक नागरिकांनी रस्ते सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना, वेगमर्यादेची अंमलबजावणी आणि स्पीडब्रेकर उभारण्याची मागणी पुन्हा एकदा पुढे केली आहे.




