बेळगाव लाईव्ह : उद्यमबाग येथील बेळगाव-खानापूर राज्य महामार्गावरील स्टेट बँक कॉर्नर येथे आज दुपारी एक मोठी दुर्घटना टळली. एका मालवाहतूक ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने भररस्त्यात तब्बल दीड तास भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यावेळी घटनास्थळी एकही रहदारी पोलीस उपलब्ध नसल्याने परिस्थिती अत्यंत बिकट बनली होती; मात्र स्थानिक उद्योजक आप्पासाहेब गुरव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
सध्या उद्यमबागहून बेळगावकडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूचे काँक्रिटीकरण सुरू असल्याने वाहतूक एकाच बाजूने (वन-वे) सुरू आहे. त्यातच आज दुपारी १२ च्या सुमारास खानापूरहून माल भरून येणारा एक ट्रक स्टेट बँक कॉर्नरजवळ अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे रस्त्याच्या मधोमध थांबला. एकेरी मार्ग आणि त्यातच अवजड ट्रक बंद पडल्यामुळे उद्यमबाग डीआयसी ऑफिस समोर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
रस्त्यावर रहदारी पोलीस उपस्थित नसल्यामुळे चालकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला आणि हॉर्नच्या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. या भीषण चक्काजाममुळे कडक उन्हात प्रवासी आणि वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. या गोंधळाची माहिती मिळताच, सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे स्थानिक उद्योजक आप्पासाहेब गुरव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
आप्पासाहेब गुरव यांनी स्वतः रस्त्यावर उतरून आधी वाहतूक नियंत्रित केली. त्यानंतर त्यांनी दुसरा एक ट्रक मागवून घेतला आणि त्याच्या साहाय्याने ब्रेक फेल झालेला ट्रक ओढून रस्त्याच्या कडेला लावला. त्यांच्या या तत्पर आणि शिस्तबद्ध प्रयत्नांमुळे दीड तासांपासून ठप्प झालेली वाहतूक अखेर सुरळीत झाली. संकटसमयी पोलिसांची वाट न पाहता नागरिकांना दिलासा दिल्याबद्दल गुरव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.




