belgaum

आमदारांनी २५ लाख मराठी भाषिकांच्या भावनांशी खेळू नये : शुभम शेळके

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी ‘बेळगाव हा कर्नाटकाचा अविभाज्य घटक असून सीमा प्रश्नाविरोधी ठराव मी स्वतः मांडीन’ असे विधान केल्यामुळे २५ लाख सीमावासीयांच्या जखमेवर मीठ चोळले गेले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांनी आमदारांना विनाकारण फाटक्यात पाय न घालण्याचा आणि मराठी भाषिकांच्या भावनांशी न खेळण्याचा कडक इशारा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून उत्तरच्या आमदारांचे कन्नड संघटनांवर प्रेम जास्तच उतू जात असल्याची प्रतिक्रिया मराठी भाषिकांमधून उमटत आहे. बेळगावातील जनता एक चांगला माणूस म्हणून तुमच्याकडे पाहत असताना, असे कृत्य केल्यास तुम्ही स्वतःच स्वतःच्या राजकीय अधोगतीकडे वाटचाल कराल, असे शुभम शेळके यांनी स्पष्ट केले. हा सीमा लढा शेकडो लोकांच्या बलिदानावर आणि ७० वर्षांच्या त्यागावर उभा असून मराठी माणसाने कधीही कुणावर वैयक्तिक टीका न करता प्रामाणिकपणे हा लढा चालवला आहे, याची जाण आमदारांनी ठेवावी.

कोविडच्या काळात मएसमार्फत सुरू केलेल्या विलगीकरण कक्षाला आमदारांच्या अंजुमन संस्थेने सहकार्य केले होते, याची आठवण करून देत शेळके यांनी हा हुतात्म्यांचा तळतळाट न घेण्याचा प्रेमाचा सल्ला दिला आहे.

 belgaum

ज्यांनी ज्यांनी हुतात्म्यांच्या आणि मराठी माणसांच्या भावनांचा अवमान केला, त्यांची राजकीय कारकीर्द संपली हा इतिहास आहे. त्यामुळे स्वतःचे भविष्य सुरक्षित ठेवायचे असल्यास इतिहासाचा विचार करावा.

मराठी भाषिक कोणत्याही कायदा व सुव्यवस्थेला बाधा न आणता, लोकशाही व शांततेच्या मार्गाने आपल्या मूलभूत हक्कांसाठी लढत आहेत. सरकारने खोटे गुन्हे दाखल करून आणि हजारो लोकांना तुरुंगात डांबूनही हा लढा थांबलेला नाही. असे असतानाही केवळ कोणाच्या तरी सांगण्यावरून लाखो लोकांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न झाल्यास मराठी माणूस गप्प बसणार नाही आणि याचे गंभीर परिणाम भविष्यात भोगावे लागतील, असा इशारा शुभम शेळके यांनी दिला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.