बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात हेरॉईन या अमली पदार्थाची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या तीन आरोपींना सीसीबी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून लाखो रुपयांचे हेरॉईन आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील तांगडी गल्ली येथील महादेव मंदिरामागील मोकळ्या जागेत हेरॉईनची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मंजुनाथ छजंत्री आणि पथकाने सापळा रचून ही धडक कारवाई केली.
या कारवाईत पोलिसांनी निल नारायण बळ्ळारी, कपिल गजानन होसूरकर आणि आकाश आनंद साळुंखे या बेळगावमधील तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून ९ लाख ५० हजार रुपये किमतीचे ४७.२९ ग्रॅम हेरॉईन, दुचाकी, ३ मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण १० लाख ३१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा अमली पदार्थ त्यांनी मुंबईतील एका महिलेकडून आणल्याची कबुली दिली असून पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी या कामगिरीबद्दल तपास पथकाचे कौतुक केले आहे.
बेळगावात गांजा सेवन आणि पब्लिक ड्रिंकिंग प्रकरणी सहा जणांना अटक
बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांविरुद्ध माळमारुती आणि मार्केट पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी छापे टाकून सहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा सेवन केल्याप्रकरणी समशुद्दीन गौनुशाह मकानदार आणि इम्रान इश्तियाक अन्सारी या दोघांना पीएसआय आनंद अदगोंडा व पीएसआय पी. एम. मोहिते यांच्या पथकाने वैद्यकीय तपासणीनंतर अटक केली. तर मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत पी. बी. रोडनजीक आणि कोईता क्रॉसजवळ सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे मद्यपान करणाऱ्या विनय सोमशेखर विरूपाक्षी, अमित मारुती कांबळे, शिवप्पा गुरुपादप्पा हुंडलगोळ आणि प्रवीण सिद्राय नायक यांना पीएसआय मणिकंठ हूहारी व पीएसआय हुसेनसाब केरूर यांच्या पथकाने ताब्यात घेतले.
आरोपींकडून विविध मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर अबकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी या कारवाईचे कौतुक केले आहे.




