बेळगाव लाईव्ह : दोन देश, दोन संस्कृती आणि हजारो किलोमीटरचे अंतर… मात्र एका २२ वर्षीय भारतीय सैनिकाच्या शौर्यकथेने बेळगाव आणि इटलीतील विद्यार्थ्यांना एकमेकांच्या जवळ आणले. नाईक यशवंत घाडगे यांच्या शौर्यगाथेच्या निमित्ताने भारत आणि इटलीतील विद्यार्थ्यांमध्ये नुकताच अनोखा संवाद रंगला.
बेळगाव येथील Army Public School, The MARATHA LIRC आणि इटलीतील मॉन्टोन येथील Giuseppe Polidori Secondary School या दोन शाळांमधील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन संवाद साधत एकमेकांच्या शाळा, संस्कृती आणि इतिहासाची ओळख करून घेतली.
या संवादाचा केंद्रबिंदू होते नाईक यशवंत घाडगे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इटलीच्या भूमीवर अवघ्या २२व्या वर्षी शहीद झालेल्या घाडगे यांना मरणोत्तर Victoria Crossने सन्मानित करण्यात आले. मॉन्टोन येथे आजही त्यांच्या स्मृती जपल्या जात आहेत.
बेळगावच्या विद्यार्थ्यांनी इटलीतील आपल्या मित्रांना नाईक घाडगे यांच्या शौर्याची कथा सांगितली. त्यांच्या पराक्रमावर आधारित निवेदित मूकनाट्य सादर करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी मराठा रेजिमेंटशी असलेले आपल्या शाळेचे नाते आणि रेजिमेंटल म्युझियमची झलकही दाखवली.

यानंतर दोन्ही देशांतील विद्यार्थ्यांमध्ये मनमोकळा संवाद झाला. इतिहासाच्या पुस्तकातील एक घटना अचानक त्यांच्या समोर जिवंत झाली. इटलीतील विद्यार्थ्यांनी घाडगे यांच्या स्मारकाविषयी सांगितले, तर बेळगावच्या विद्यार्थ्यांनी भारतीय लष्करी परंपरा आणि मराठा रेजिमेंटची माहिती दिली.
एका भारतीय जवानाच्या बलिदानाने जोडले गेलेले हे विद्यार्थी नाते केवळ इतिहासापुरते मर्यादित राहिले नाही, तर दोन देशांतील नव्या पिढीच्या मैत्रीचा सुंदर धागा ठरले.
भारत आणि इटलीच्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. दूरवर असलेल्या दोन शाळांमधील या संवादातून एकच भावना प्रकर्षाने समोर आली—शौर्याची कथा काळ आणि सीमांच्या पलीकडेही माणसांना जोडू शकते.





